विजेतेपदाचा दावेदार मानला जाणाऱ्या रॉजर फेडरर व स्टानिस्लास वॉवरिंका यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत धडाकेबाज प्रारंभ केला. तसेच जपानच्या केई निशिकोरी व स्थानिक खेळाडू निकोलस मॅहुत यांनीही विजयी वाटचाल केली. महिलांमध्ये सिमोना हॅलेप व एकतेरिना माकारोवा यांनी विजयी सलामी केली.
फेडररने द्वितीय मानांकनाला साजेसा खेळ करीत कोलंबियाच्या अ‍ॅलजान्द्रो फल्लाचे आव्हान ६-३, ६-३, ६-४ असे सहज संपुष्टात आणले. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांबरोबर बॅकहँडचेही सुरेख फटके मारले. माजी ग्रँड स्लॅम विजेता वॉवरिंकालाही मर्सेल इलिहास याच्याविरुद्ध विजय मिळवताना फारशी अडचण आली नाही. त्याने हा सामना ६-३, ६-२, ६-३ असा जिंकला. फेडरर व वॉवरिंका यांच्यात या स्पध्रेत उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडण्याची शक्यता आहे.
आश्चर्यजनक विजय नोंदविण्याची क्षमता असलेल्या माकरेस बघदातीसने २५व्या मानांकित इव्हान कालरेव्हिकला पराभवाचा धक्का दिला. त्याने हा सामना ७-६ (७-५), ६-४, ६-४ असा चुरशीच्या लढतीनंतर जिंकला.
 निशिकोरीने फ्रान्सचा पॉल हेन्रीक मॅथियूचा ६-३, ७-५, ६-१ असा पराभव केला. जर्मन खेळाडू फिलिप कोहेलश्रेबरने एकतर्फी लढतीत जपानच्या गो सोएदा याचा धुव्वा उडवला. त्याने हा सामना ६-१, ६-०, ६-२ असा जिंकताना चतुरस्र खेळाचा प्रत्यय घडवला.
महिलांमध्ये सिमोनाने एव्हगेनिया रोदिनाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आणले. तिने रंगतदार लढतीत ७-५, ६-४ असा विजय मिळविला. माकारोवाने दुसऱ्या फेरीत वाटचाल करताना लुइसा चिरिकोला ६-४, ६-२ असे पराभूत केले. सर्बियाच्या बोजाना जोवानोवस्कीने दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. तिने युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्कोचा १-६, ६-१, ६-० असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर तिने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवत विजयश्री खेचून आणली. क्रोएशियाच्या डोना व्हेकिकने ३१वी मानांकित खेळाडू कॅरोलिना गार्सियाला पराभवाचा धक्का दिला. चुरशीने झालेली ही लढत तिने ३-६, ६-३, ६-२ अशी जिंकली.