पायाच्या टाचेच्या दुखापतीमुळे सर्वोत्तम महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने सध्या सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. अन्य लढतींमध्ये अनुभवी व्हिक्टोरिया अझारेंकाला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. पुरुष एकेरीतून विक्रमी १२ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालसह तिसरा मानांकित ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

सेरेनाची बुधवारी दुसऱ्या फेरीतील लढत होती. मात्र त्या लढतीपूर्वीच तिने स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. ‘‘२०२० या उर्वरित वर्षांत खेळू शकेन की नाही याबाबत शंका आहे. दुसऱ्या फेरीच्या लढतीपूर्वी सरावही केला होता. मात्र त्याच वेळेस सामन्यातून माघार घ्यावी लागेल हे जाणवले होते. पुढील चार ते सहा आठवडे मला विश्रांती घ्यावी लागेल,’’ असे ३९ वर्षीय सेरेनाने म्हटले आहे. सेरेनाने माघार घेतल्याने आता ती विक्रमी २४ ग्रँडस्लॅमच्या विजेतेपदाशी बरोबरी करू शकेल की नाही याबाबत चर्चाना सुरुवात झाली आहे. अर्थातच २०१७ नंतर तिने एकही ग्रँडस्लॅम पटकावलेले नाही.

पुरुष एकेरीत नदालने अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डला ६-१, ६-०, ६-३ असे सहज पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये दुसरा गेम मॅकडोनाल्डने जिंकल्यानंतर पुढील सलग ११ गेम नदालने जिंकले. लाल मातीवरील वर्चस्व याबरोबरच नदालने मॅकडोनाल्डविरुद्धच्या लढतीत दाखवून दिले. अमेरिकन खुल्या स्पर्धेतील विजेता थिमने अमेरिकेच्या जॅक सॉकला ६-१, ६-३, ७-६ असे नमवले. पहिले दोन सेट थिमने सहज जिंकले. मात्र सॉकला तिसऱ्या सेटमध्ये तीनवेळा सेट जिंकण्याचे गुण मिळाले होते. मात्र त्यातून थिमने बाजी मारली.

महिला एकेरीत आणखी एक धक्कादायक निकाल ठरला तो ३१ वर्षीय बेलारुसच्या अझारेंकाच्या रूपाने. अझारेंकाने नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. मात्र लाल मातीवर तिचा फार निभाव लागला नाही. १०व्या मानांकित अझारेंकाला स्लोव्हाकियाच्या अ‍ॅना कॅरोलिन श्मिड्लोवाने ६-२, ६-२ असे पराभूत केले. अझारेंकाने सलामीच्या लढतीतच थंड वातावरण आव्हानात्मक असल्याचे म्हटले होते. आठ अंश सेल्सियसमध्ये खेळताना गोठेन अशी भीती वाटल्याचे अझारेंकाने पहिल्या लढतीतील विजयानंतर म्हटले होते. महिलांमध्ये अन्य लढतीत गेल्या वर्षीची या स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठणारी अमेरिकेची १९ वर्षीय अ‍ॅमंडा अ‍ॅनिसिमोवाने तिसरी फेरी गाठली. गेल्या वर्षी या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठलेली ती एकमेव खेळाडू यंदा टिकून आहे. दुसऱ्या फेरीत अ‍ॅनिसिमोवाने अमेरिकेच्याच बर्नर्डा पेराला ६-२, ६-० असे नमवले. तिसरी मानांकित युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने तिसरी फेरी गाठताना मेक्सिकोच्या रेनाटा झाराझुवाला ६-३, ०-६, ६-२ असे पराभूत केले.

पुरुषांमध्ये त्सित्सिपासला सलामीलाच झुंजावे लागले. स्पेनच्या फारशा परिचित नसलेल्या जॉमी मुनारविरुद्ध त्याला पहिले दोन सेट गमवावे लागले होते. मात्र त्यातून पुनरागमन करत त्याने ४-६, २-६, ६-१, ६-४, ६-४ अशी विजयी सलामी दिली. त्सित्सिपासला रविवारी संपलेल्या हॅम्बुर्ग खुल्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले होते. वाविरकाने सलामीला अँडी मरेला नमवल्यानंतर दुसऱ्या फेरीत जर्मनीच्या डॉमिनिक कोफरला ६-३, ६-२, ३-६, ६-१ असे पराभूत केले.

* वेळ : दुपारी २:३० पासून

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २

लढाऊ विमानाच्या आवाजाने घबराट

फ्रेंच स्पर्धेत बुधवारी लढाऊ विमानाच्या आवाजाने एकच घबराट उडाली होती. फक्त खेळाडूच नाही तर पॅरिसमधील नागरिकही हा नेमका कसला भीषण आवाज आहे या विचाराने घाबरले होते. लढाऊ विमान मोठा आवाज करत गेल्यानंतर काही क्षणात अनेकांनी समाजमाध्यमावरून हा आवाज कसला आहे याची विचारणा करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. फ्रेंच स्पर्धेतही त्या वेळेस वावरिंका आणि कोफर यांच्यात लढत सुरू होती. ते क्षणभर खेळायचे थांबले होते. महिलांमध्ये एलिना स्वितोलिना आणि रेनाटा झाराझुवा यांच्यातील लढत काही क्षण थांबली होती. मात्र थोडय़ा वेळाने ते फ्रान्सच्या लष्कराचे लढाऊ विमान होते हे स्पष्ट करण्यात आले.