भारताचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बराच काळ क्रिकेटपासून दूर असल्याने त्याने हा निर्णय घेतला. त्याच्या निवृत्तीनंतर त्याला माजी क्रिकेटपटू आणि सहकाऱ्यांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मिळाल्या. मात्र सध्या चर्चेत असलेल्या एका मुद्द्यावरून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांच्यात मतभेद असल्याचे समोर आले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC सध्या चार दिवसांच्या क्रिकेट कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी आग्रही आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच ICC च्या बैठकीत चर्चिला जाणार आहे. या मुद्द्यावरून अनेक माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ञ्जांनी ICC वर टीका केली आहे. गौतम गंभीरने तर ही कल्पना मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे, पण इरफान पठाणने मात्र या कल्पनेला पाठिंबा दर्शवला आहे.

काय म्हणाला आहे इरफान पठाण?

“चार दिवसांच्या कसोटी क्रिकेट सामन्यांबाबत बोलायचे झाले तर काही काळासाठी तसे सामने खेळून पाहायला काहीच हरकत नाही. पुढील दोन वर्षांसाठी हा प्रयोग करता येऊ शकतो. क्रिकेटच्या भविष्यासाठी असा प्रयोग झाला तर चांगलेच आहे. भारतात चार दिवसांचे रणजी क्रिकेट सामने खेळले जातात. त्यात बहुतांश सामन्याचे निकाल लागतात. मग कसोटी क्रिकेटमध्ये हा प्रयोग का नको? सध्याच्या प्रकारात सामन्याचे निकाल लागतात हे मला मान्य आहे, पण चार दिवसांचे सामने खेळले तर त्याची रंगत आणखी वाढेल आणि सामन्यांचा निकाल लागण्याच्या दृष्टीने संघ खेळ करतील. चार दिवसांच्या कसोटी क्रिकेटला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे”, असे इरफानने स्पष्ट केले.

गंभीरचं काय आहे मत?

गौतम गंभीरने आपल्या स्तंभात चार दिवसाच्या कसोटी सामन्याच्या कल्पनेबद्दल रोखठोक मत व्यक्त केले आहे. “चार दिवसाच्या कसोटी सामन्याची कल्पना हे अत्यंत मूर्खपणाचे आहे. ही कल्पना अजिबात अंमलात आणली जाऊ नये. ही कल्पना म्हणजे अनिर्णित सामन्यांना निमंत्रण असेल. फिरकीपटूंना स्वत:ला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळणार नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटची मजा कमी होईल. अशा कल्पनांपेक्षा खेळाडू आणि खेळपट्टीचा दर्जा याकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असे गंभीरने नमूद केले.