युवा खेळाडूंसाठी दिग्गजांची शाबासकी हुरूप वाढवणारी असते. मात्र दिग्गजांकडून झालेली टीका जिव्हारी लागू शकते. भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या खेळासंदर्भात माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी भाष्य केले होते. यामध्ये त्यांनी अक्षरच्या खेळातील उणिवा मांडल्या होत्या. गावस्करांच्या टीकेने नाऊमेद न होता, खेळात योग्य सुधारणा करण्याचा मानस अक्षरने व्यक्त केला.
‘‘गावस्करांच्या वक्तव्याने मी चकित झालो. मात्र त्यांच्यासारख्या दिग्गजाने काढलेले उद्गार गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. टीका कोणालाही चुकलेली नाही. सचिन तेंडुलकरसारख्या मातब्बर खेळाडूलाही कधीही ना कधी अशा टप्प्यातून जावे लागले आहे. त्यामुळे गावस्करांच्या बोलण्याने निराश न होता, खेळात सुधारणा करणार आहे,’’ असे अक्षरने सांगितले.
कसोटी संघात फिरकीपटूच्या स्थानासाठी अक्षर पर्याय होऊ शकत नाही, असे परखड मत गावस्कर यांनी व्यक्त केले होते. ‘‘अक्षर सहजतेने चेंडू सोडतो, त्याच्या गोलंदाजीचा अंदाज घेता येतो. चेंडूला उंची आणि उसळी देत नाही,’’ असे गावस्कर यांनी सांगितले होते. यावर अक्षर म्हणाला, ‘‘टीका मनावर घेऊन काहीही साध्य होणार नाही. आई-वडिलांचा नेहमीच पाठिंबा मिळाला आहे. भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे, याचाच अर्थ माझ्यात गुणवत्ता आहे. कठीण कालखंडातच लोकांची खरी ओळख कळते. गावस्करांनी मांडलेले कच्चे दुवे दूर करून सुधारण्याचा माझा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापेक्षा विजय हजारे चषकात गुजरातसाठी चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न आहे.’’