‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारणे मोठी गोष्ट आहे. पात्रता फेऱ्यांतील कामगिरीमुळे आत्मविश्वास मिळाला आणि त्यामुळेच अंतिम फेरीत बहुतांशी वेळ मी आघाडीवर राहू शकले,’’ असे स्टीपलचेसपटू ललिता बाबरने सांगितले. या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळणारी ललिता पहिली भारतीय क्रीडापटू ठरली होती.
अंतिम फेरीत ललिताला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने ही शर्यत ९ मिनिटे, २९ सेकंदात पूर्ण केली. सुरुवातीच्या सहा मिनिटांत ललिताने अन्य धावपटूंना मागे टाकत भक्कम आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये केनियाच्या धावपटूंनी सरशी साधली.
‘‘अंतिम फेरीतही मला माझ्या शैलीनुसार धावायचे होते. प्रशिक्षक निकोलाई स्नीसारेव्ह यांच्याही तशाच सूचना होत्या. मी अजिबात दडपणाखाली नव्हते. अन्य स्पर्धक शेवटच्या टप्प्यांमध्ये दमदार कामगिरी करणारे आहेत, याची कल्पना होती. मला आघाडी मिळवणे क्रमप्राप्त होते, ती मी मिळवली. मात्र शेवटच्या मिनिटांमध्ये मी मागे पडले. परंतु मी शेवटपर्यंत झुंज दिल्याचे समाधान आहे,’’ असे ललितने सांगितले.