जागतिक  बॉक्सिंग स्पर्धा

भारताचे उच्च कामगिरी संचालक सांतिएगो निएवा यांचे मत

भारतात पहिल्यांदाच जागतिक बॉक्सिंग स्पर्धा १५ ते २४ नोव्हेंबरदरम्यान रंगणार असून भारताची अव्वल बॉक्सर मेरी कोमकडून सर्वानाच सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. पण भारताचे उच्च कामगिरी संचालक सांतिएगो निएवा यांच्या मते, मेरी कोमसाठी सुवर्णपदक पटकावणे सोपे नसेल. मेरी कोमला या स्पर्धेत कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात तिला कामगिरी उंचवावी लागणार आहे. तरच तिला सुवर्णपदकावर नाव कोरता येईल, असे निएवा यांनी सांगितले.

दडपणाखाली कशी कामगिरी करायची, याचे तंत्र मेरीला अवगत आहे. याआधीही तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. यावेळीही तिच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा भारताला आहे, असे निएव्हा म्हणाले. या स्पर्धेत भारताने किमान तीन पदकांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापेक्षा चांगली कामगिरी हा यजमानांसाठी बोनस असेल. मेरी कोमसह लव्हलिना (६९ किलो) आणि मनीषा (५४ किलो) यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे, असे निएवा यांना वाटते.

अर्जेटिनात जन्मलेले स्वीडनवासी निएवा म्हणाले की, ‘‘आम्ही या स्पर्धेत सुवर्णपदकासह तीन पदकांची अपेक्षा बाळगली आहे. जर हे उद्दिष्ट आम्ही साध्य करू शकलो नाही तर मी निराश होईन. मेरी कोमसह लव्हलिना (६९ किलो) आणि मनीषा (५४ किलो) यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.’’ पाच वेळा जागतिक विजेती ठरलेली आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारी मेरी कोम हिच्या नेतृत्वाखाली भारताचे १० जणांचे पथक नवी दिल्लीत रंगणाऱ्या जागतिक स्पर्धेत सहभागी होणार आहे.

दिल्लीतील खराब प्रदूषणाचा फटका सहभागी होणाऱ्या जगभरातील बॉक्सर्सना बसेल, असे निएवा यांना वाटत नाही. ‘‘प्रदूषण ही जगातील प्रमुख शहरांना भेडसावणारी समस्या आहे. बीजिंग ऑलिम्पिकदरम्यानही आम्ही त्याचा अनुभव घेतला होता. भारतीय सरकार त्याविषयी कसून प्रयत्न करत आहे. पण बॉक्सिंग हा इन्डोअर खेळ असल्यामुळे खेळताना त्याचा त्रास होईल, असे मला वाटत नाही.’’