भारताची आघाडीची जिमनॅस्ट दिपा कर्माकरने रविवारी तुर्कीत झालेल्या जिमनॅस्टीक विश्वचषकात इतिहासाची नोंद केली. अंतिम फेरीत दिपाने सुवर्णपदकाची कमाई करत, भारताला आगामी आशियाई खेळांआधी आणखी एका पदकाची आशा लावून दिली आहे. अंतिम फेरीत दिपाने १४.१५० गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. याआधीही पात्रता फेरीत दिपाने १३.४०० गुणांची कमाई केली होती.

या कामगिरीनंतर मायदेशात सर्वच स्तरातून दिपाचं कौतुक करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी दिपावर अभिनंदनाचा वर्षाव केला. दिपानेही ट्विटरच्या माध्यमातून आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानत, हे पदक आपल्यावर सतत विश्वास ठेवणाऱ्यांचं असल्याचं म्हटलं आहे.

१८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान इंडोनेशियात होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय जिमनॅस्ट संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. या संघात दिपाचा समावेश करण्यात आलेला असल्यामुळे या स्पर्धेत दिपाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.