खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा

भारताची सर्वाधिक वेगवान महिला धावपटू द्युती चंदने शनिवारी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याशिवाय नरेंद्र प्रतापसिंगने स्पर्धेतील दुसऱ्या सुवर्णपदकावर नाव कोरले.

कलिंगा औद्योगिक तंत्रज्ञान संस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २४ वर्षीय द्युतीने ११.४९ सेकंदांत विजयी अंतर गाठले. मँगलोर विद्यापीठाची धनलक्ष्मी एस. आणि महात्मा गांधी विद्यापीठाची स्नेहा यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी द्युती २०० मी. धावण्याच्या शर्यतीतसुद्धा सहभागी होणार आहे.

पुरुषांच्या ५,००० मी. धावण्याच्या शर्यतीत मँगलोर विद्यापीठाच्या नरेंद्रने (१४.१८.१९ मिनिटे) अव्वल क्रमांक मिळवला. मँगलोर विद्यापीठाच्याच आदिशने दुसरे स्थान मिळवले. नरेंद्रने दोन दिवसांपूर्वीच १० हजार मी. प्रकारातसुद्धा सुवर्णपदक मिळवले होते.

पुरुषांच्या १०० मी. धावण्याच्या प्रकारात भारतीदासन विद्यापीठाच्या जी. काथिरावनने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. काथिरावन आणि भारती विद्यापीठाचा एम. कार्तिकेयन या दोघांनीही १०.६८ सेकंदांत विजयी अंतर सर केले. परंतु शतांश सेकंदाच्या फरकात काथिरावनने बाजी मारली.

महिलांच्या ८०० मी. प्रकारात पंजाबी विद्यापीठाच्या हरमिलन बैन्सने विजेतेपद मिळवले. तिने २.०६.४० मिनिटांत इतके अंतर पूर्ण केले. मँगलोर विद्यापीठाच्या कृष्णा कुमारने दोन दिवस चाललेल्या डीकॅथलॉन प्रकारात सर्वाधिक ६,२१० गुणांसह सुवर्णपदक जिंकले.

काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळाकडे वळल्याने पहिल्याच स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याची अपेक्षा नव्हती. २०२०मध्ये प्रथमच मी एखाद्या स्पर्धेत सहभागी झाली. यापुढील स्पर्धामध्ये विजयी अंतर अधिक कमी वेळेत गाठण्यासाठी मेहनत घेईन.

– द्युती चंद, धावपटू