एखाद्या भारतीय क्रिकेटपटूचा वाढदिवस असला की सारेच सहकारी आणि चाहते त्याला शुभेच्छा देतात. या सर्व शुभेच्छांनामध्ये कायम माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने दिलेल्या शुभेच्छांची चर्चा रंगते. कारण सेहवाग दर वेळी कोणत्या न कोणत्या हटके पद्धतीने खेळाडूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज या हटके शुभेच्छा देणाऱ्या विरेंद्र सेहवागचाच वाढदिवस… सेहवागने आज (मंगळवारी) वयाच्या ४२व्या वर्षात पदार्पण केले. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने आपला वेगळा ठसा उमटवलाच पण त्याचसोबत निवृत्तीनंतर तो अतिशय बिनधास्त अंदाजामुळे चाहत्यांना मनात घर करून आहे. अशा या अवलिया क्रिकेटपटूवर कर्णधार विराट कोहली ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. महत्त्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेदेखील सेहवागचा व्हिडीओ पोस्ट करत त्याला सदिच्छा दिल्या.

सेहवागची समृद्ध कारकीर्द

विरेंद्र सेहवागने १ एप्रिल १९९९ रोजी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्याने २५१ वन डे सामन्यात ८,२७३ धावा केल्या. यात १५ शतकं आणि ३८ अर्धशतकांचा समावेश होता. त्याने वन डे कारकिर्दीत १ द्विशतकही झळकावलं. याशिवाय ९६ बळीदेखील टिपले. विरूने १०४ कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व केलं. कसोटी कारकिर्दीत त्याने २३ शतकं आणि ३२ अर्धशतकं ठोकत ८,५८६ धावा केल्या. त्याने भारताकडून दोन त्रिशतकंही ठोकली. तसेच कसोटी कारकिर्दीत ४० बळी घेतले.