भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक ७ बळी टिपले. त्याच्या या कामगिरीमुळे तो अजूनही तितक्याच ताकदीने प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारू शकतो हे त्याने दाखवून दिले. त्यामुळे भारतातील फिरकीपटूंची पुन्हा एकदा चर्चा रंगली. त्यातच भारताच्या आणखी एका फिरकीपटूचे नावही सध्या चर्चेत आहे. हरभजन सिंग हा लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार असे अंदाज गेले काही दिवस क्रिकेट वर्तुळात वर्तवण्यात येत आहेत. पण मी निवृत्ती अजिबात स्वीकारणार नाही. इतकेच नव्हे तर मी पुढच्या IPL मध्ये CSK संघाकडून खेळणारही आहे, असे हरभजनने स्पष्ट केले.

२० ऑक्टोबरपासून इंग्लंडमध्ये IPL च्या धर्तीवर द हंड्रे़ड नावाची एक क्रिकेट लीग स्पर्धा सुरू होणार आहे. त्यात निवड झालेल्या २५ परदेशी खेळाडूंमध्ये हरभजनचा समावेश आहे. त्यामुळे हरभजन निवृत्त होणार अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे. BCCI च्या नियमानुसार एखाद्या भारतीय खेळाडूला परदेशातील क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये खेळायचे असेल, तर त्यासाठी आधी निवृत्ती जाहीर करावी लागते. त्यामुळेच या चर्चांना उधाण आले. पण हरभजनने मात्र ही शक्यता फेटाळून लावली.

“मी BCCI च्या नियमांचा आदर करतो. IPL मधील माझा सहभाग टिकवून ठेवण्यासाठी मला द हंड्रेड या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही याची मला कल्पना नव्हती. मला ही बाब आताच समजली आहे. मी अजिबात निवृत्त होणार नाहीये. मला जर कोणी IPL आणि द हंड्रेड या दोन स्पर्धांमध्ये निवड करायला सांगितले तर मी नक्कीच IPL ची निवड करेन. मी लवकरच ‘द हंड्रेड’मधील माझे नाव आणि सहभाग काढून घेईन”, असे हरभजनने स्पष्ट केले.