सामना संपायला अवघी काही मिनिटे असताना मँचेस्टर सिटीच्या खेळाडूंकडून झालेल्या ढिसाळ खेळाचा फायदा उठवत चेल्सीच्या फर्नाडो टोरेसने निर्णायक गोल करत संघाला विजय मिळवून दिला. चेल्सीने २-१ असा निसटता विजय मिळवला. या सनसनाटी विजयासह चेल्सीने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
दोन तगडय़ा संघांमधील हा मुकाबला बरोबरीत संपण्याची शक्यता होती. ३३व्या मिनिटाला चेल्सीच्या आंद्रे स्युरलने गोल केला. मध्यंतरानंतर सिटीच्या सर्जिओ ऑग्युरोने गोल करत बरोबरी करून दिली. यानंतर दोन्ही संघांनी बचाव अभेद्य करत आक्रमण थोपवले. ही लढत १-१ बरोबरीत सुटणार अशी चिन्हे होती. मतिजा नॅसटॅसिक आणि गोलरक्षक जो हार्ट यांच्यात चेंडूवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या झालेल्या गोंधळामुळे सिटीने हा सामना गमावला. गोलरक्षक हार्टने गोलपोस्टच्या बाहेरच्या टोकाशी येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र घाईघाईत चेंडू त्याच्याकडून निसटला आणि चेल्सीच्या फर्नाडो टोरेसने चपळाईने गोल करत चेल्सीला शानदार विजय मिळवून दिला.
विविध स्पर्धाच्या लढती मिळून चेल्सीचा हा सलग पाचवा विजय आहे. या विजयासह चेल्सीने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. अव्वल स्थानी असलेल्या अर्सेनलपेक्षा ते केवळ दोन गुणांनी पिछाडीवर आहेत.
अन्य लढतींमध्ये सुदरलँडने न्यूकॅस्टलवर २-१ अशी मात केली. स्वान्सी आणि वेस्ट हॅम यांच्यातील लढत ०-० बरोबरीत सुटली. टॉटनहॅमने हलला १-० असे नमवले.