९७ सामन्यांमध्ये ५० च्या सरासरीने ७५६८ धावा करणाऱ्या हाशिम आमलाच्या नावे अनेक विक्रम आहे. परंतु, दक्षिण अफ्रिका विरुद्ध श्रीलंका सामन्यामध्ये हाशिम आमलाच्या नावे असा विक्रम झाला ज्याचा त्याला कदापिही अभिमान वाटणार नाही. कसोटी क्रिकेटला १४० वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या खेळात काही खेळाडूंनी १०,००० रनांचा टप्पा गाठला तर काही खेळाडूंनी ५०० विकेट्सचा टप्पा गाठला. यादिवसानंतर हाशिम आमलाचे नाव एका विचित्र रेकॉर्डसोबत जोडले जाणार आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण १०,००० जण एलबीडब्ल्यू झाले आहेत, आमला हा टेस्ट क्रिकेटचा पायचित (एलबीडब्ल्यू) होणारा १०,००० वा बळी ठरला आहे. पोर्ट एलिजाबेथ येथे झालेल्या सामन्यात ५१ व्या ओव्हरला श्रीलंकेच्या नूवान प्रदीपने हाशिम आमलाला पायचित केले आणि ते दोघे या विचित्र विक्रमाचे भागीदार बनले.

पहिला पायचितचा बळी
जगातील पहिला सामना मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर १८७६ ला खेळण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज टॉम गॅरेटने इंग्लंडच्या हॅरी ज्यूपला पायचित केले होते. ऑस्ट्रेलियाने हा सामना ४५ धावांनी जिंकला होता.

पायचितचा पहिला भारतीय बळी
पायचित होणारा पहिला भारतीय फलंदाज १९३२ मध्ये भारतीय संघ पहिल्यांदा इंग्लंड दौऱ्यावर गेला. इंग्लंडने पहिल्या डावात २५९ धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात भारताचा खेळ सुरू झाला. भारतीय फलंदाज नूमल जूमल हे ३३ धावांवर खेळत होते. त्यांना वॉल्टर रॉबिन्सने पायचित केले होते.

पायचित बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज
इंग्लंड विरुद्धच्या याच सामन्यात सी. के. नायडू यांनी एडी पेंटर यांना १४ धावा खेळत असताना टिपले होते. सी. के. नायडू हे पायचित घेणारे पहिले भारतीय गोलंदाज ठरले.

पायचितचा वाद टाळण्यासाठी डिआरएसची प्रणाली
२००८ साली डिसीजन रिव्ह्यू सिस्टम (डीआरएस) ची चाचणी घेण्यात आली. भारत विरुद्ध श्रीलंकेच्या सामन्यात या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. ही पद्धत योग्य असल्याचे लक्षात येताच २००९ पासून टेस्टमध्ये डीआरएसचा वापर सुरू झाला. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात ही प्रणाली अंमलात आणली गेली.