News Flash

माफीनंतरच पाकिस्तानच्या खेळाडूंना संधी – बात्रा

पाकिस्तान संघात अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांचे हॉकी इंडिया लीगमध्ये स्वागतच होईल

पाकिस्तान संघात अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांचे हॉकी इंडिया लीगमध्ये स्वागतच होईल, मात्र त्यांच्या बेशिस्त वर्तनास आम्ही थारा देणार नाही. या गैरवर्तनासाठी त्यांनी माफी मागितली तरच त्यांचा स्पर्धेसाठी विचार करण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी घेतली.
गतवर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या चॅम्पियन्स स्पर्धेत पाकिस्तानच्या दोन खेळाडूंवर बेशिस्त वर्तनासाठी कारवाई करण्यात आली होती. त्यांनी भारतीय खेळाडूंच्या दिशेने अपशब्द उच्चारले होते, तसेच सामना जिंकल्यानंतर अतिशय लज्जास्पद वर्तन केले होते. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने त्यांच्यावर बंदी घातली आहे. हॉकी लीगच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानचे नऊ खेळाडू सहभागी झाले होते, मात्र नंतर राजकीय मतभेदांमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना या लीगमध्ये संधी मिळालेली नाही.

..तर गुरबाजचा समावेश होईल
भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू गुरबाजसिंग याच्यावर सध्या शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे. त्याच्यावरील खटल्याची १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जर त्यामध्ये गुरबाजच्या बाजूने निकाल लागला व त्याच्यावरील बंदीची कारवाई स्थगित झाली तर त्याचा या लीगमध्ये समावेश होईल असे बात्रा म्हणाले.

हॉकी इंडिया लीग स्पर्धेच्या नव्या हंगामासाठी नवे नियम
* मैदानी गोल करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हॉकी इंडिया लीगच्या चौथ्या मोसमात एका मैदानी गोलला दोन गुण दिले जाणार आहेत. आगामी लीगकरिता तयार करण्यात आलेल्या नियमावलीत या नियमाचा समावेश करण्यात आला आहे.
* लीगसाठी खेळाडूंचा लिलाव १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या लिलावात १३५ भारतीय खेळाडू व १४१ परदेशी खेळाडूंकरिता बोली लावली जाणार आहे.
* प्रत्येक फ्रँचाईजीला २४ खेळाडूंऐवजी वीस खेळाडू घेण्यास परवानगी दिली जाईल. त्यापैकी बारा खेळाडू भारतीय असतील तर आठ खेळाडू परदेशी असतील.
प्रत्येक संघात किमान दोन गोलरक्षकांचा समावेश अनिवार्य करण्यात आला आहे.
* संघात समावेश करण्यात आलेले सर्व खेळाडू सामन्याच्या वेळी उपस्थित असणे बंधनकारक करण्यात आले आहे. बेशिस्त वर्तनावर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येक पेनल्टी स्ट्रोकच्या वेळी झालेल्या एक गोलाच्या वेळी दोन गोल बहाल केले जातील.
* या नियमावलीस आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या स्पर्धा व नियमावली समितीने मान्यता दिली आहे. गोल पद्धतीत अन्य बदल करण्यात आलेला नाही.
* मैदानी गोलऐवजी अनेक खेळाडू पेनल्टी कॉर्नरची प्रतीक्षा करीत असतात. त्यामुळे पेनल्टी कॉर्नरतज्ज्ञ तयार केले जातात. पेनल्टीऐवजी अन्य वेळी गोल करण्यासाठी खेळाडूंचे कौशल्य वाढावे या हेतूनेच मैदानी गोलकरिता दोन गुण देण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2015 1:10 am

Web Title: hockey india coach narendra batra says allow pakistan in hilonly after apology
टॅग : Hockey,Pakistan
Next Stories
1 धोनीवरील फौजदारी कारवाईस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
2 अमेरिकन ओपन : फेडररपुढे जोकोविचच ठरला भारी!
3 शास्त्री आणि कंपनीला ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत मुदतवाढ
Just Now!
X