भारतीय हॉकी संघातला मधल्या फळीतला खेळाडू मनप्रीत सिंहची हॉकी इंडियाने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. मनप्रीत सिंहसोबत मधल्या फळीतला आणखी एक अनुभवी खेळाडू धरमवीर सिंह आणि महिला संघाची गोलकिपर सविता हीचं नावही अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलेलं आहे. या खेळाडूंव्यतिरीक्त प्रशिक्षक बी.एस.चौहान यांची द्रोणाचार्य पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा – BLOG: आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी !

सर्व खेळाडूंनी गेल्या काही वर्षांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावरच त्यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली असल्याचं, हॉकी इंडियाचे महासचिव मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितलं आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये मनप्रीतने भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही मनप्रीतने चांगली कामगिरी केली होती. दुसरीकडे २०१४ साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये हॉकीत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघात धरमवीरचा समावेश होता.