चंदिगढ : तीन वेळच्या ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या भारतीय संघाचे आघाडीचे हॉकीपटू बलबीर सिंग सीनियर यांना श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते अत्यवस्थ आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

सेंटर फॉरवर्ड जागेवर खेळणारे महान हॉकीपटू म्हणून बलबीर सिंग (९४) हे हॉकीप्रेमींना ज्ञात आहेत. बुधवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यापासून त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होत असतानाच शुक्रवारी त्यांची प्रकृती पुन्हा ढासळू लागली असून दुपारी ते अत्यवस्थ होते. एकाच हॉकीपटूने कोणत्याही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल लगावण्याचा विश्वविक्रम अद्यापही अबाधित आहे. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध नेदरलँड या सामन्यात भारताने ६-१ असा विजय मिळवताना त्यातील ५ गोल हे एकटय़ा बलबीर सिंग सीनियर यांनी केले होते. त्याशिवाय १९७५ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे ते व्यवस्थापक होते. त्यांना १९५७ साली पद्मश्री देऊन गौरविण्यात आले होते. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०१२ साली गौरवलेल्या जगभरातील १६ महान हॉकीपटूंमध्ये बलबीर सिंग यांचा समावेश होता. त्यांच्या फुप्फुसात पुरेशा प्रमाणात हवा जाण्यासाठी एक नळी आत टाकण्यात आली असून  त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे पीजीआय हॉस्पिटलच्या श्वसन विभागप्रमुखांनी सांगितले. बलबीर सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘गोल्ड’ या चित्रपटात अभिनेता अक्षयकुमार याने भूमिका केली होती.