भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, हा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. आपल्या कर्णधारपदाच्या काळात धोनीने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. भारतीय संघाचे माजी सहायक प्रशिक्षक पॅडी अपटन यांनी आपल्या ‘Barefoot’ या पुस्तकातून धोनीच्या नेतृत्वक्षमतेचं कौतुक केलं आहे.

अपटन यांनी आपल्या पुस्तकामध्ये संघाला शिस्त लावण्याबद्दल, कसोटी संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि वन-डे संघाचा कर्णधार धोनी यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. “मी भारतीय संघात सहायक प्रशिक्षक म्हणून रुजू झालो तेव्हा अनिल कुंबळे कसोटी संघाचा तर धोनी वन-डे संघाचा कर्णधार होता. यावेळी सरावसत्राला आणि संघाच्या बैठकीला हजर राहण्याबद्दल खेळाडूंना शिस्त लागावी यासाठी अनिल कुंबळेने, उशीरा आलेल्या खेळाडूला दहा हजारांचा दंड भरण्याचा पर्याय सूचवला.”

“यानंतर धोनीला शिक्षेबद्दल विचारण्यात आलं होतं. यावेळी धोनीने यामध्ये एक ट्विस्ट आणत उशीरा आलेल्या खेळाडूसह सर्व खेळाडूंना दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. यानंतर कोणताही खेळाडू सरावसत्र आणि संघाच्या बैठकीला उशीरा आला नाही.” अपटन यांनी आपल्या पुस्तकात धोनीचं कौतुक केलं आहे. अपटन यांनी आपल्या पुस्तकातून अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.