नुकताच आयपीएलचा तेरावा हंगाम पार पडला. आयपीएलच्या तेराव्या हंगामानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पोहोचला आहे. दरम्यान, सामन्यांपूर्वी क्रिकेटपटूंना नियमांप्रमाणे काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हादेखील सध्या आयसोलेशनमध्ये आहे. विराट कोहलीनं आपल्या आयसोलेशन डायरीतील एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये विराट आपल्या लॅपटॉपवर काही पाहत बसल्याचं दिसत आहे. क्वारंटाइन असताना एक चांगली वेब सीरिज पाहून वेळ घालवला असं विराटनं म्हटलं आहे. यावर नेटफ्लिक्सनंही मजेशीर उत्तर दिलं आहे.

विराटनं या फोटोला कॅप्शन देताना क्वारंटाइन डायरीज, ईस्त्री न केलेलं टी-शर्ट. आरामदायक काऊच आणि पाहण्यासाठी एक उत्तम वेब सीरिज असं म्हटलं. यावर नेटफ्लिक्स इंडियानं मजेशीर उत्तर दिलं आहे. “कम्प्युटर स्क्रिनवर आम्ही आहोत. विराटसोबत फोटो घेण्याचं आमचं स्वप्न पूर्ण झालं.” यासोबतच रडणारं एक इमोजीदेखील नेटफ्लिक्सनं शेअर केलं आहे.

नेटफ्लिक्सनं दिलेल्या उत्तरालाही हजारो युझर्सनं लाईक केलं आहे. तर अनेकांनी विराटला कोणती वेब सीरिज पाहिली पाहिजे याबद्दलही सांगितलं.