ऑगस्ट महिन्यात होणारी हैदराबाद खुली बॅडमिंटन स्पर्धा करोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) सुधारित वेळापत्रक सादर करून ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला.

भारतात होणाऱ्या तीन नामांकित बॅडमिंटन स्पर्धापैकी एक असलेली ही स्पर्धा ११ ते १६ ऑगस्ट या कालावधीत होणार होती. भारतातील बॅडमिंटन स्पर्धाना या स्पर्धेद्वारे सुरुवात होणार होती.  ‘‘बीडब्ल्यूएफ आणि भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने हैदराबाद खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशांमधील स्पर्धाविषयी त्या-त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील. बीडब्ल्यूएफने काही निर्णय घेतले असले तरी त्याच्या सुधारित वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही,’’ असे बीडब्ल्यूएफचे अध्यक्ष थॉमस लुंड यांनी सांगितले.

थॉमस लुंड म्हणाले की, ‘‘आरोग्य, सुरक्षितता आणि प्रवासावरील निर्बंध यावर आम्हाला काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागत आहे. सर्व देशांतील परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत आम्हाला वेळोवेळी निर्णय घ्यावे लागतील.’’

राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सद्य:स्थितीत ही स्पर्धा घेणे अशक्य असल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘‘हैदराबादमध्ये अद्यापही टाळेबंदी कायम आहे. केंद्र सरकारने क्रीडा सरावाला अनुमती दिली असली तरी तेलंगणा सरकारने मात्र त्या बाबतीत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्हाला त्याबाबतच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात ही स्पर्धा घेणे शक्य नव्हते,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.