पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ६६ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ ३०८ धावांपर्यंत मजल मारु शकता. हार्दिक पांड्या आणि शिखर धवन वगळता एकाही भारतीय फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. विराट कोहली, मयंक अग्रवाल, श्रेअस अय्यर आणि राहुल स्पशेल अपयशी ठरले. सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीनं भारताच्या पराभवाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे…

विराट कोहली सामन्यानंतर बोलताना म्हणाला की, मालिका सुरु होण्यापूर्वी सराव करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळाला होता. पराभवासाठी कोणतेही कारण शोधत नाही. आम्ही मोठ्या कालावधीपासून टी-२० क्रिकेट खेळत आहे. २५ व्या षटकापर्यंत सर्व काही ठीक सुरु होतं. मात्र, त्यानंतर सर्वच खेळाडूंची बॉडी लँग्वेजमध्ये ढिलाई आल्याचं दिसलं. गोलंदाजीत आम्हाला काही प्रयोग करायला हवेत. हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी तयार नाही. त्या क्षेत्रात आम्हाला काम करायची गरज आहे. कोणताही अष्टपैलू खेळाडू संघाला संतुलन देऊ शकतो. ऑस्ट्रेलियासाठी स्टॉयनिस आणि मॅक्सवेलसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. हार्दिक गोलंदाजी करु शकत नसल्यामुळे पर्याय कमी उपलबद्ध होते.

विराट कोहली पुढे म्हणाला की, ३७५ धावांच्या आवाहनाचा पाठलाग करताना आम्ही योजना तयार केली होती. त्यावर सर्व फलंजाजांनी काम केलं नाही. आघाडीच्या तीन खेळाडूकडून मोठ्या डावाची आवशकता होती. मात्र, तसं झालं नाही. हार्दिकची खेळी सर्व भारतीयांसाठी एक उदाहरण आहे. या सामन्यात आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळलं असून संपूर्ण मालिकेत असेच सकारात्मक खेळण्याचा प्रयत्न करु. हसत हसत स्वत: गोलंदाजी करण्याचंही त्यानं सांगितलं.

भारतीय संघाचा हा लागोपाठ चौथा पराभव आहे. करोना महामारीच्या आधी भारतला न्यूझीलंडकडून तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात फिंच, स्मिथ, वॉर्नर आणि मॅक्सवेलच्या फंलदाजीपुढे भारतीय गोलंदाजी खुजी वाटत होती. भारताकडून शामीचा अपवाज वगळता एकाही गोलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही.