आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून होणारं शस्त्रसंधींचं उल्लंघन, अतिरेकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद होणं यासारख्या घटनांमुळे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही प्रकारे क्रीडा सामने होत नाहीयेत. आंतराष्ट्रीय सामन्यांचा अपवाद वगळता भारत आणि पाकिस्तान हे देश कोणत्याही क्रीडा प्रकारात आपला सहभाग टाळत आहेत. बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेला करार बीसीसीआयने मोडल्यामुळे सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे दाद मागितली आहे. याचसोबत हॉकी इंडिया संघटनेनेही पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही प्रकारे सामने खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती. मध्यंतरीच्या काळात पाकिस्तान हॉकी संघाच्या सहभागावारुन हॉकी इंडियाने काही स्पर्धांमधून माघारी घेण्याचा मार्ग पत्करला होता, तर काही स्पर्धांमध्ये भारताच्या दबावामुळे पाकिस्तानला स्पर्धेत स्थान देण्यात आलं नाही.

मात्र आगामी काळात भारत आणि पाकिस्तान हे संघ हॉकी सामन्यात समोरासमोर उभे ठाकू ठकतात. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटेनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी भारत-पाक हॉकी सामन्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. “आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी भारत-पाक यांच्यात सामने व्हावेत या मताचा आहे. मात्र या दोन्ही संघटनांमध्ये नेमक्या काय समस्या आहेत आणि त्या कशा सोडवायच्या हे दोघांनाही एकत्र बसून ठरवावं लागेल. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना दोन्ही संघटनांना मदत करायला तयार आहे.” पुण्यात स्थानिक हॉकी सामन्यांच्या अंतिम फेरीसाठी हजेरी लावणाऱ्या बत्रांनी भारत-पाक सामन्यांवर आपलं मत मांडलं आहे.

भारतीय हॉकी संघाच्या सध्याच्या कामगिरीवरही नरेंद्र बत्रा यांनी समाधान व्यक्त केलं. याआधी भारतीय संघ कोणत्याही मोठ्या स्पर्धेत तिसऱ्या किंव्या चौथ्या स्थानावर राहायचा. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये भारताच्या खेळात चांगली सुधारणा झालेली आहे. आगामी काळात भारतीय संघ आपल्या कामगिरीत सातत्य राखेल, असा विश्वास बात्रा यांनी व्यक्त केला. आगामी वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेसाठी भारताच्या संघात अनुभवी सरदार सिंहचा समावेश करण्यात आलेला नाहीये. सरदारच्या कामगिरीबद्दल विचारलं असता बत्रा म्हणाले, “सरदार सिंह हा भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. वाढत्या वयामुळे त्याचा खेळ मंदावत चालला आहे असं अनेकांना वाटत असलं तरीही माझ्यामते सरदार आणखी काही वर्षे सहज हॉकी खेळू शकतो. २०२० टोकियो ऑलिम्पिकपर्यंत सरदार भारतासाठी नक्की खेळेल अशी मला आशा आहे.”