चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी लढत होणार आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आठव्या सत्रात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध अंतिम सामन्यात खेळताना दिसणार आहेत. यापूर्वी आयसीसीच्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ समोरा-समोर आले होते. यावेळी विश्वचषकातील विक्रम अबाधित ठेवत भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता.

२००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या पहिल्या विश्वचषकात आशियातील दोन संघ झटपट क्रिकेटमध्ये बहरदार कामगिरी करतील, असे स्वप्नातही कोणाला वाटले नसेल. मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघानी पहिल्या टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात पोहोचून एक इतिहासच रचला. अंतिम सामन्यातील लढतीपूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यातील साखळी सामना देखील रंगतदार झाला होता. धोनीच्या नेतृत्वाखील डरबनच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानने चांगली खेळी करत भारतीय गोलंदाजांची  दमछाक केली. मात्र, त्यांना निर्धारित २० षटकात ७ बाद १४१ धावांपर्यंतच मजल मारता आली.

या सामन्याचा निकाल लावण्यासाठी पहिल्यांदाच बॉल आऊट या नियमाचा वापर करण्यात आला. यावेळी पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजाला थेट स्टंपवर चेंडूचा मारा करण्यात अपयश आले. याउलट धोनीने आणखी एक यशस्वी चाल केली. अटीतटीच्या क्षणी त्याने मुख्य गोलंदाजांकडे चेंडू सोपवण्यापेक्षा वीरेंद्र सेहवाग, रॉबिन उथप्पा आणि हरबजन सिंग यांना पसंती देण्याचा योग्य निर्णय घेत पाकिस्तानला चित केले. साखळी सामन्यातील या पराभवाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तान अंतिम सामन्यात चांगल्या तयारीने मैदानात उतरला. जोहन्सबर्गच्या मैदानावर पुन्हा एकदा भारताने प्रथम फलंदाजी केली. निर्धारित २० षटकात भारताने पाकिस्तानसमोर १५७ धावांचे लक्ष्य ठेवले. यात गौतम गंभीरने ७५ धावांची खेळी केली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाने चांगली टक्कर दिली. यावेळी पाकिस्तान करिश्मा करण्याच्या उंबरठ्यावर असताना धोनीचा मास्टर प्लॅन पुन्हा यशस्वी ठरला. सामना हातातून निसटत असताना कर्णधार धोनीने जोगिंदर शर्माच्या हाती चेंडू  सोपवून सर्वांना थक्क केले. जोगिंदरच्या गोलंदाजीवर मिसबाह उल हकने अनअपेक्षित फटका मारला अन् श्रीशांतने त्याचा अप्रतिम झेल टिपला. या सामन्यात पाकिस्तानचा डाव १९. ३ षटकात १५२ धावांवर आटोपला. भारताने हा सामना पाच धावांनी जिंकत पहिल्या वहिल्या टि-२० विश्वचषकावर नाव कोरले.

या स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तान रविवारी पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरत आहेत. दहावर्षापूर्वी विश्वचषकातील पुनरावृती करुन यास्पर्धेतील जेतेपदावर पुन्हा नाव कोरण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे. तर पराभव विसरुन नव्या दमाने भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा संघ नक्कीच करेल.