‘सबसे बडा मोह’ असं गेले काही दिवस ज्या सामन्याचं वर्णन सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनलवर केलं जातंय त्या भारत-पाक सामन्याचा ज्वर आता सर्वत्र पसरायला सुरुवात झालीये. १८ तारखेला रविवारी ओव्हलच्या मैदानात हे दोन्ही संघ विजेतेपदासाठी एकमेकांसमोर पुन्हा एकदा उभे ठाकणार आहेत. पहिल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा डकवर्थ लुईस नियमानूसार १२४ धावांनी पराभव केला होता.

पहिल्या पराभवानंतर मात्र पाकिस्तानी संघाने आपल्या कामगिरीत सुधारणा केली. उपांत्य फेरीत इंग्लंडच्या संघावर अनपेक्षितपणे मात करत पाकिस्तानने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. तर भारताने बर्मिंहहॅम येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या संघावर ९ गडी राखत विजय मिळवून अंतिम फेरीतलं आपलं तिकीट बुक केलं. २००७ च्या टी-२० विश्वचषकानंतर भारत-पाकिस्तान पहिल्यांदाच एखाद्या अंतिम सामन्यात समोरासमोर येणार आहेत.

पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानी संघात झालेली सुधारणा पाहिल्यानंतर अंतिम सामन्याआधी त्यांना हलकं लेखण्याची चूक विराट कोहलीची टीम इंडिया करणार नाही. विशेषकरुन हसन अलीची गोलंदाजी आणि फलंदाजीमधली कामगिरी पाहता अंतिम सामन्यात भारतीयांसमोर हसन अली डोकेदुखी ठरू शकतो. पाकिस्तानची फलंदाजी आतापर्यंत चिंतेचा विषय ठरली असली तरीही फखार झमानचं फॉर्ममध्ये येणं ही पाकिस्तानची जमेची बाजू मानली जातेय. भारतीयांसाठी सध्या सगळ्या गोष्टी सुरळीत सुरु असून गोलंदाजीत अधिकाधिक सुधारणा करण्याकडे प्रशिक्षक अनिल कुंबळेचा कल असेल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सामना कोणत्या दिवशी आहे?

१८ जून रोजी म्हणजेच रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना कधी सुरू होईल?

भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कुठल्या वाहिनीवर बघता येईल?

स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स ४ वर सामना पाहता येणार आहे.

सामन्याचे ऑनलाईन स्ट्रिमिंग कुठे बघता येईल?

भारत आणि पाकिस्तान सामन्याचे ऑनलाईन स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहता येईल.

या सामन्याचे वैशिष्ट्य काय असेल?

२००७ सालच्या टी-२० विश्वचषकानंतर भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पहिल्यांदाच आयसीसीच्या एका महत्वाच्या स्पर्धेत समोरासमोर येत आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारतीय संघात कोणाचा समावेश आहे?

कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा

पाकिस्तानच्या संघात कोणाचा समावेश आहे?

सरफराज अहमद (कर्णधार/यष्टीरक्षक), अहमद शेहजाद, अझर अली, बाबर आझम, फहिम अश्रफ, फखार झमान, हारिस सोहेल, हसन अली, इमाद वासीम, जुनैद खान, मोहम्मद आमीर, मोहम्मद हाफीज, रुमान रईस, शादाब खान, शोएब मलिक, उमर अकमल, वहाब रियाझ

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचा आतापर्यंतचा इतिहास काय सांगतो?

चॅम्पियन्स करंडकात भारत पाकिस्तान आतापर्यंत ४ वेळा समोरासमोर आले आहेत. यापैकी दोन्ही संघांनी २-२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याची भारतीय संघाकडे नामी संधी आहे.

हा सामना कुठे खेळला जाणार आहे?

ओव्हलच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला जाणार आहे.