२०२१ साली होणारा टी-२० विश्वचषक हा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारतामध्येच होणार आहे. आयसीसीने आज यावर शिक्कामोर्तब केलं आहे. २०२१ साली ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज याव्यतिरीक्त पापुआ न्यू गिनी, नामिबीया, नेदरलँड, ओमान आणि स्कॉटलंड हे संघही या स्पर्धेत सहगभागी होणार आहेत.

सध्याच्या घडीला २०२१ चा टी-२० विश्वचषक हा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारतातच आयोजित केला जाईल. ICC च्या प्रवक्त्यांनी माहिती दिली. २०२० साली ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक हा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे २०२० ऐवजी २०२२ सालच्या स्पर्धेचं यजमानपद हे ऑस्ट्रेलियाला मिळणार असल्याचं ICC ने याआधीच स्पष्ट केलं होतं.

याआधी २०१६ सालीने भारतात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. करोनाची परिस्थिती लक्षात घेता स्पर्धेच्या आयोजनात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जातील अशी माहिती आयसीसीने दिली. आरोग्यविषयक सर्व नियम व सहभागी संघातील सर्व सदस्यांची काळजी घेतली जाईल अशी सुविधा बीसीसीआय करेल असं आश्वासक सचिव जय शहा यांनी दिलं.