सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार अरॉन फिंचच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्रिशतकी मजल मारली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर आणि अरॉन फिंच जोडीने पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना करत शतकी भागीदारी रचली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी १४६ धावा जोडल्या. फिंच माघारी परतल्यानंतर वॉर्नरने अन्य फलंदाजांच्या सोबतीने आपलं शतक साजरं केलं.

वॉर्नरने १११ चेंडूत १०७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरचं हे तिसरं शतक ठरलं आहे. २०१७ साली वॉर्नर पाकिस्तानविरुद्ध अखेरचे दोन वन-डे सामने खेळला होता. त्या सामन्यातही वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावलं होतं.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानच्या आक्रमणातही हवाच काढून घेतली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिरने ऑस्ट्रेलियन कर्णधार अरॉन फिंचला माघारी धाडत कांगारुंना पहिला धक्का दिला. यानंतर डेव्हिड वॉर्नरने स्मिथच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र स्टिव्ह स्मिथ आणि पाठीमागून आलेला ग्लेन मॅक्सवेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतले. दरम्यानच्या काळात वॉर्नरने आपलं शतक साजरं केलं. मात्र १०७ धावांवर तो ही माघारी परतला. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिर, शाहिन आफ्रिदी यांनी भेदक मारा करत कांगारुंची अखेरची फळी कापून काढली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरच्या ५ बळींव्यतिरीक्त शाहिन आफ्रिदीने २ तर हसन अली-वहाब रियाझ-मोहम्मद हाफिज यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.