विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

या सामन्यातील थरार आणि स्पर्धा पाहून सारेच भारावून गेले. क्रिकेटविश्वातून दोनही संघांना कौतुकाची थाप मिळाली. तशातच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही दोनही संघांचे तोंडभरून कौतुक केले. त्याने आपल्या ट्विटच्या माध्यमातून इंग्लंडच्या संघाचे अभिनंदन केले आणि न्यूझीलंडच्या संघाचेही कौतुक केले. “विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोनही संघ तुल्यबळ होते. दोनही संघांनी दमदार कामगिरी केली. विश्वविजेत्या इंग्लंडचे अभिनंदन”, असे ट्विट करत कोहलीने दोनही संघांची स्तुती केली.

दरम्यान, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.