अफगाणिस्तान विरुद्धच्या विश्वचषक सामन्यात बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी २६२ धावा केल्या. मुशफिकूर रहीम (८३) आणि शाकिब अल हसन (५१) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगलादेशने अफगाणिस्तानला २६३ धावांचे आव्हान दिले.

चांगल्या लयीत असणारा शाकिब अल हसन याने या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने अर्धशतकी खेळी करत विश्वचषक स्पर्धेत १ हजार धावांचा पल्ला गाठला. बांगलादेशच्या संघाकडून अशी कामगिरी करणारा शकिब हा पहिलाच खेळाडू ठरला. तसेच विश्वचषक स्पर्धेत एक हजारी मनसबदार ठरणारा तो जगातील १९ वा खेळाडू ठरला.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. बांगलादेशच्या डावाची सुरुवात फारशी सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १७ धावांवर लिटन दास माघारी परतला. त्याने केवळ २ चौकार लगावले. तमिम इकबालने शाकिब अल हसनच्या साथीने चांगली खेळी केली. त्या दोघांमध्ये ५९ धावांची भागीदारी झाली. पण बॅकफूटवर येऊन फटका मारताना तो नबीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने ३६ धावा केल्या. शाकिब अल हसनने मात्र आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावले. पण दुर्दैवाने ५१ धावांवर खेळताना तो पायचीत झाला. शाकिबने केवळ १ चौकार लगावला. मुशफिकूर रहीम आणि शाकिब यांच्यात ६१ धावांची भागीदारी झाली.

शाकिब माघारी गेल्यानंतर मुशफिकूर रहिमने डावाची सूत्रे हात घेतली. पण दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळू शकली नाही. सौम्या सरकार केवळ ३ धावांवर बाद झाला. महमदुल्लाहदेखील चांगली सुरुवात मिळाल्यानंतर २७ धावा करून माघारी गेला. शेवटच्या टप्प्यात मुशफिकूर रहिमने फटकेबाजी केली. त्याने ४ चौकार आणि १ षटकार खेचत ८७ चेंडूत ८३ धावा केल्या. मोसादेक २४ चेंडूत ३५ धावांची आक्रमक खेळी केली आणि बांगलादेशला ५० षटकात ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारून दिली. मुजीबने ३, नैबने २ तर झादरान आणि नबी यांनी १-१ बळी टिपला.