20 June 2019

News Flash

यंदा नशीब पालटणार का?

आफ्रिकेला यंदाही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

अ‍ॅलन डोनाल्ड, लान्स क्लुसनर, जॅक कॅलिस, एबी डी’व्हिलियर्स यांसारख्या एकापेक्षा एक मातब्बर खेळाडूंना घडवणाऱ्या आफ्रिकेला आजपर्यंत एकदाही जगज्जेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे दडपणाच्या परिस्थितीत खेळ उंचावण्यात नेहमीच अपयशी ठरलेल्या आफ्रिकेला गेल्या अनेक वर्षांपासून ‘चोकर्स’ (दडपणाखाली ढेपाळणारे) म्हणून ओळखले जाते. त्याशिवाय बहुतांश वेळा नशिबाची साथ न लाभल्यामुळेही त्यांना पराभूत व्हावे लागले आहे; परंतु या संघात प्रतिस्पर्धी संघांना त्यांच्याच मैदानावर जाऊन धूळ चारण्याची क्षमता आहे. विश्वचषकाच्या इतिहासात आफ्रिकेला आजपर्यंत एकदाही अंतिम फेरीसुद्धा गाठता आलेली नाही. म्हणूनच यंदा फॅफ डय़ू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणारा आफ्रिकेचा संघ ‘चोकर्स’चा शिक्का पुसून पहिल्यावहिल्या विश्वचषकावर नाव कोरणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

इतिहास

१९९२ : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अधिकृत सदस्यत्व नसल्यामुळे १९७५ ते १९८७च्या विश्वचषकांमध्ये त्यांना सहभागी होता आले नाही. विश्वचषकाच्या पाचव्या हंगामात दक्षिण आफ्रिकेचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला. केप्लर वेसल्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने गटसाखळीत आठपैकी पाच सामने जिंकून सहज उपांत्य फेरी गाठली. मात्र उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धचा त्यांचा सामना डकवर्थ- लुइस पद्धतीमुळे आजही कायम स्मरणात राहतो. ४५ षटकांत २५३ धावांचा पाठलाग करताना अखेरच्या १३ चेंडूंत आफ्रिकेला २२ धावांची आवश्यकता होती. मात्र त्यानंतर १० मिनिटांसाठी झालेल्या वरुणराजाच्या वर्षांवामुळे आफ्रिकेपुढे अवघ्या एका चेंडूंत २२ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवण्यात आले. साहजिकच आफ्रिकेचा या सामन्यात पराभव झाला.

१९९६ : कर्णधार हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आफ्रिकेने दिमाखदार कामगिरी करत ‘ब’ गटातून पाचही सामन्यांत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली; परंतु ब्रायन लाराचे (१११) दमदार शतक आणि रॉजर हार्परच्या (४/४७) भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेची पुरती दैना झाली आणि सलग दुसऱ्या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. या विश्वचषकात संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध झालेल्या सामन्यात गॅरी कर्स्टनने १८८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. २०१५च्या विश्वचषकापर्यंत कोणत्याही फलंदाजाद्वारे विश्वचषकात नोंदवलेली गेलेली ही सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या होती. २०१५ मध्ये ख्रिस गेलने (२१५) झिम्बाब्वेविरुद्ध कर्स्टनचा हा विक्रम मोडला.

१९९९ : या विश्वचषकातही आफ्रिकेने अप्रतिम खेळ करत ‘अ’ गटात पाच सामन्यांमधून चार विजयांसह अव्वल क्रमांक मिळवला. अव्वल सहा (सुपर सिक्स) फेरीत आफ्रिकेने पाचपैकी तीन सामन्यांत यश संपादन करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज असलेल्या आफ्रिकेपुढे या वेळी बलाढय़ ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. अपेक्षेप्रमाणे हा सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. २१४ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला अखेरच्या तीन चेंडूंत एका धावेची आवश्यकता असताना अ‍ॅलन डोनाल्ड धावचीत झाला आणि विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारण्याचे त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. सामना टाय झाला आणि अव्वल सहा फेरीत निव्वळ धावगती सरस राखल्यामुळे ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसनरने संपूर्ण विश्वचषकात सुरेख खेळ करून २५० धावा आणि १७ बळी मिळवले. त्याशिवाय शॉन पोलॉकनेही या विश्वचषकात दोन वेळा पाच बळी घेण्याची किमया साधली.

२००३ : विश्वचषकाचे यजमानपद भूषवणाऱ्या आफ्रिकेने या विश्वचषकात सपशेल निराशा केली. शॉन पोलॉकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आफ्रिकेला या विश्वचषकात साखळी फेरीचाही अडथळा ओलांडता आला नाही. मुख्य म्हणजे साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा पावसाने त्यांचा खेळखंडोबा केला. २७० धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने ४५ षटकांत सहा बाद २२९ धावा केल्या असताना पावसाचे आगमन झाले आणि डकवर्थ-लुइसनुसार आफ्रिकेची धावसंख्या अपेक्षित धावसंख्येइतकीच असल्याने सामना टाय म्हणून घोषित करण्यात आला. आफ्रिकेने अवघी एक धाव अधिक केली असती तरी त्यांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला असता.

२००७ : वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या विश्वचषकात ‘अ’ गटात समावेश असलेल्या आफ्रिकेने तीन सामन्यांत दोन विजय मिळवले. अव्वल आठ फेरीतही (सुपर ८) आफ्रिकेने सातपैकी चार सामन्यांत विजय मिळवून तिसऱ्यांदा उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. मात्र ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वाखालील आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अक्षरश: निराशाजनक कामगिरी केली. ग्लेन मॅकग्रा आणि शॉन टेटच्या गोलंदाजीपुढे आफ्रिकेचा डाव १४९ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य तीन फलंदाजांच्या मोबदल्यात सहज गाठले.

२०११ : आफ्रिकेने पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरी करून ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळवले. त्यांनी भारत, वेस्ट इंडिज, बांगलादेश, आर्यलड, नेदरलँड्स या संघांना नमवले, तर इंग्लंडविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व सामन्यात आफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे ठाकल्याने सर्वानाच कोणता संघ उपांत्य फेरी गाठणार, याची उत्सुकता होती; परंतु महत्त्वाच्या सामन्यात नेहमीच सुमार कामगिरी करणाऱ्या आफ्रिकेने पुन्हा एकदा निराशा केली. न्यूझीलंडने दिलेल्या २२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचे फलंदाज १७१ धावांपर्यंतच मजल मारू शकले. विश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक एबी डी’व्हिलियर्सने प्रत्येकी दोन शतके आणि अर्धशतके झळकावत हा विश्वचषक गाजवला.

२०१५ : आतापर्यंतच्या विश्वचषकांपैकी सर्वोत्तम कामगिरीची नोंद आफ्रिकेने २०१५च्या विश्वचषकात केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्यांनी विश्वचषकात ४०० धावा गाठणारा पहिला संघ ठरण्याचा मान मिळवला. त्याशिवाय कर्णधार डी’व्हिलियर्सने (६६ चेंडू, १६२ धावा) सर्वात जलद दीडशतक झळकावण्याचा विक्रमही स्वत:च्या नावावर केला. ‘ब’ गटात त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले तरी आफ्रिकेने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच बाद फेरीचा एखादा सामना जिंकला. उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी श्रीलंकेला सहज धूळ चारली. उपांत्य सामन्यात पुन्हा एकदा आफ्रिकेपुढे स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या यजमान न्यूझीलंडचे आव्हान होते. या सामन्यात आफ्रिकेच्या फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी करत न्यूझीलंडपुढे डकवर्थ लुइस नियमाच्या साहाय्याने ४३ षटकांत २९८ धावांचे लक्ष्य उभे केले; परंतु क्षेत्ररक्षणात केलेल्या असंख्य चुकांचा फटका त्यांना महागात पडला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढतीत ग्रँट एलियटने डेल स्टेनला विजयी षटकार लगावून केलेला जल्लोष आणि त्यानंतर आफ्रिकन खेळाडूंची झालेली अवस्था पाहून अनेकांनी या सामन्याची विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट सामना म्हणून निवड केली.

अपेक्षित कामगिरी

आफ्रिकेला यंदाही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्यात त्यांना अडथळा येणार नाही असे वाटते. परंतु यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत व न्यूझीलंड यांसारख्या बलाढय़ संघांकडून त्यांना कडवी झुंज मिळेल.

बलस्थाने आणि कच्चे दुवे

इंग्लंडच्या खेळपट्टय़ांना साजेशी वेगवान गोलंदाजांची फळी हीच आफ्रिकेची प्रमुख ताकद आहे. डेल स्टेन, कॅगिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी यांच्यात कोणत्याही संघाला कमीत कमी धावांत गुंडाळण्याची क्षमता असून कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असणारा फिरकीपटू इम्रान ताहिरमुळे आफ्रिकेचा संघ अधिक बलवान वाटतो; परंतु फलंदाजीत क्विंटन डी’कॉक आणि डय़ू प्लेसिस यांच्यावर अतिरिक्त भार असून हाशिम अमला, जेपी डय़ुमिनी, डेव्हिड मिलर यांना कामगिरी सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. एबी डी’व्हिलियर्सची निवृत्ती त्यांना कमालीची जाणवणार आहे.

First Published on May 20, 2019 12:25 am

Web Title: icc cricket world cup 2019 south africa