इंग्लंडमध्ये सध्या विश्वचषक स्पर्धा २०१९ सुरु आहे. या स्पर्धेतील बरेचसे सामने झाले आहेत. पण असे असले तरी कोणते अंतिम ४ संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाणार, याबाबतचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान हे संघ या शर्यतीत अतिशय जवळजवळ आहेत. इंग्लंडला पराभूत करणाऱ्या श्रीलंकेलाही अंतिम ४ संघात स्थान मिळवण्याची संधी निर्माण होऊ शकते. या स्पर्धेतून केवळ अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ पूर्णपणे बाहेर पडले आहेत.

अफगाणिस्तान हा संघ तुलनेने दुबळा असल्याने स्पर्धेबाहेर जाणे अपेक्षित होतेच, पण धक्कादायक बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकाला देखील या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. आफ्रिका स्पर्धेतून बाहेर पडण्याचे आणि त्याच्या खराब कामगिरीचे खापर आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने IPL वर फोडले आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा IPL मध्ये दिल्लीच्या संघातून खेळला होता. या संघातून खेळताना त्याने दिल्लीला अंतिम ४ संघांमध्ये स्थान मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. पण त्याची IPL मधील चांगली कामगिरी ही विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या खराब कामगिरीसाठी कारणीभूत ठरली असल्याचे मत डु प्लेसिसने व्यक्त केले आहे.

“रबाडाची कामगिरी चांगली का होऊ शकली नाही याचे नेमके उत्तर देणे कठीण आहे. पण IPL मध्ये जाऊन खेळू नकोस असे त्याला आम्ही सांगितले होते. त्याने IPL न खेळण्यासाठी आम्ही पुरेपूर होते. त्याने आफ्रिकेतच रहावे आणि तंदुरुस्त राहून ताजेतवाने होऊन विश्वचषक स्पर्धेत उतरावे असे आम्हाला वाटत होते. पण तो IPL स्पर्धेसाठी गेला. त्यानंतरही स्पर्धेच्या मध्यातून त्याने परत यावे. शरीराला आवश्यक तितके दिवस आराम करावा आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धा खेळावी, असे आमचे म्हणणे होते. पण त्याने आणि इतर अनेक खेळाडूंनी शरीरावर अतिरिक्त ताण देऊन संपूर्ण IPL स्पर्धा खेळली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत त्याला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आली नाही.”, असे डु प्लेसिसने स्पष्टपणे सांगितले.

“IPL स्पर्धा सुरु होण्याआधीच मी त्याला आणि इतर खेळाडूंना म्हंटले होते की जे खेळाडू तिन्ही फॉरमॅट मध्ये खेळतात, त्यांनी विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याआधी पुरेशी विश्रांती कशी मिळेल याचा विचार करावा. पण दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. विश्वचषक स्पर्धेत खेळाडू तंदुरुस्त आणि ताजेतवाने नव्हते. त्यामुळे आम्हाला लवकर स्पर्धाबाहेर व्हावे लागले”, असेही डु प्लेसिसने नमूद केले.