World Cup 2019 IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज साऊदम्पन येथे सामना सुरू आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांपुढे भारतीय संघाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला कशीबशी २०० पार मजल मारता आली. भारताने ५० षटकात २२४ धावा केल्या आणि अफगाणिस्तानला २२५ धावांचे आव्हान दिले. अफगाणिस्तानकडून नबी, नैब यांनी २-२ तर मुजीब, आलम, रहमत शाह आणि रशीद खान यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.

यात गुलबदिन नैब याने भेदक मारा केला. त्याने आधी मोहम्मद शमी आणि त्यानंतर अर्धशतकवीर केदार जाधव यांना माघारी पाठवले. त्याने चेंडूच्या गतीमध्ये बदल करून मोहम्मद शमीला त्रिफळाचीत केले. गडी बाद केल्यावर दोन्ही दंडाच्या बेटकुळ्या फुगवणे ही त्याची शैली आहे. त्याच ‘मसल पॉवर’ शैलीत गुलबदिन नैबने गडी बाद झाल्याचे सेलिब्रेशन केले.

हा पहा व्हिडीओ –

त्याच शैलीची भुरळ इतर चाहत्यांनाही पडली. त्याच्या या सेलेब्रेशनची नक्कल करताना चाहते दिसून आले. त्यातील एका चाहत्याचा व्हिडीओ विश्वचषक स्पर्धेच्या अधिकृत वेबसाईटवर पोस्ट करण्यात आला आहे.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेत दोन शतके ठोकणारा रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध स्वस्तात माघारी परतला. मुजीब उर रहमानने त्याला त्रिफळाचीत करत एका धावेवर माघारी धाडले आणि भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. सलामीवीर लोकेश राहुल याने चांगली खेळी केली पण रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ३० धावा केल्या. या दरम्यान दमदार कामगिरी करत कर्णधार विराट कोहलीने ४८ चेंडूत अर्धशतक झळकावले.

चांगली सुरुवात मिळल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात विजय शंकर अपयशी ठरला. ४१ चेंडूत २९ धावा करून तो रहमत शाहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. दमदार अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली ६३ चेंडूत ६७ धावा करून माघारी गेला. विराटने ५ चौकार लगावले. मोहम्मद नबीला दुसरा बळी मिळाला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी अत्यंत संथ खेळी केली. शेवटच्या टप्प्यात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात धोनी माघारी परतला. धोनीने ३ चौकारांसह ५२ चेंडूत २८ धावा केल्या. केदार जाधवने संयमी अर्धशतक केले. पण तो देखील ६८ चेंडूत ५२ धावा काढून बाद झाला.

भारताने दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान दिले.