World Cup 2019 IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज साऊदम्पन येथे सामना सुरू आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान दिले आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली याने दमदार अर्धशतक केले. पण दुसऱ्या बाजूने त्याला चांगली साथ लाभली नाही. त्यामुळे स्वतःच धावगती वाढवण्याचा प्रयत्न करताना तो झेलबाद झाला.

६७ धावांवर खेळताना त्याने मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर चेंडू कट केला. पण चेंडू जमिनीवर ठेवण्यात त्याला अपयश आले. चेंडू हवेत उडाला तेव्हा तो चेंडू रहमत पासून बराच दूर होता. पण त्याने अत्यंत चपळपणे चेंडूचा वेध घेतला आणि अवघड वाटणारा झेल सोपा करत झेलला. जमिनीच्या अगदी जवळ असताना रहमतने चेंडू झेलला आणि कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेत दोन शतके ठोकणारा रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध स्वस्तात माघारी परतला. मुजीब उर रहमानने त्याला त्रिफळाचीत करत एका धावेवर माघारी धाडले आणि भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. सलामीवीर लोकेश राहुल याने चांगली खेळी केली पण रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ३० धावा केल्या. या दरम्यान दमदार कामगिरी करत कर्णधार विराट कोहलीने ४८ चेंडूत अर्धशतक झळकावले.

चांगली सुरुवात मिळल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात विजय शंकर अपयशी ठरला. ४१ चेंडूत २९ धावा करून तो रहमत शाहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. दमदार अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली ६३ चेंडूत ६७ धावा करून माघारी गेला. विराटने ५ चौकार लगावले. मोहम्मद नबीला दुसरा बळी मिळाला.

भारताने या स्पर्धेतील ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. पण दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या तीन तुल्यबळ संघाना भारताने धूळ चारली. अफगाणिस्तानला ५ सामन्यात अद्यापही विजय मिळवता आलेला नाही.