क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा औपचारिकरीत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. Hall of Fame या मानाच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे सचिनच्या आधी कुंबळे आणि राहुल द्रविडचा हॉल ऑफ फेममध्ये सहभाग झाला होता.

सचिनसह दक्षिण अफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्ड, ऑस्ट्रेलियाच्या माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीनसह तीन जणांना शुक्रवारी आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळालेला सचिन सहावा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना सहभागी केले होते.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने, कसोटी क्रिकेटमध्ये १५ हजाराहून अधिक धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ हजाराहून अधिक धावांबरोबरच इतरही अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.