ऑस्ट्रेलियात प्रस्तावित असलेल्या यंदाच्या T20 World Cup विश्वचषक स्पर्धेबाबत ICCकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ICCने सदस्यांची दोन वेळा बैठक बोलावली, पण त्या बैठकीत निर्णय मात्र घेण्यात आला नाही. T20 विश्वचषकाच्या आयोजनाच्या निर्णयावर IPL 2020 चं आयोजन अवलंबून आहे. ICC कडून विश्वचषकाबाबतच्या निर्णयाला उशीर होत आहे, त्यामुळे BCCI ने आपली नाराजी ICCला बोलून दाखवली आहे. या दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने ICC ला एक महत्त्वाचा सल्ला देत मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

“भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI हे आर्थिकदृष्ट्या बलाढ्य आहे. ICC मधील निर्णयात त्यांचा मोठा वाटा असतो. सध्या अशी अफवा पसरवली जात आहे की विश्वचषकाचा कार्यक्रम हा IPL आणि ऑस्ट्रेलिया-भारत क्रिकेट मालिकेच्या आयोजनात अडथळा ठरत असल्याने विश्वचषक रद्द केला जाणार आहे. जर करोनामुळे विश्वचषकाचे आयोजन करता येणार नाही अशी भूमिका ऑस्ट्रेलिया बोर्डाने घेतली तर ते स्वीकारार्ह आहे. पण त्याच काळात जर दुसरी मोठी स्पर्धा भरवण्यात येत असेल, तर त्यामुळे नक्कीच प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. ICCने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देणं अपेक्षित आहे. खासगी स्पर्धांना ICCने प्राधान्य देऊ नये”, अशा शब्दात त्याने यु ट्युब चॅनेलवरून आपली खदखद व्यक्त केली.

“सध्या सूत्रांकडून अशा बातम्या दिल्या जात आहेत की टी २० विश्वचषक रद्द केला जाणार आहे. १८ संघांतील खेळाडूंची सोय करणं हे खूप कठीण असल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड माघार घेण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये आहे आणि त्यांना सर्व आवश्यक त्या सुखसोयी पुरवल्या जात आहेत. १८ संघांना तशाच सोयी पुरवणं अवघड आहे हे बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा खासगी स्पर्धांना प्राधान्य दिल्यास नव्या पिढीसमोर चुकीचा आदर्श घालून दिल्यासारखे होईल”, असेही तो म्हणाला.