दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या एकदिवसीय मालिकेपासून प्रेक्षकांना पंचांचे संभाषण ऐकू येणार आहे. निर्णयाप्रत येण्यासाठी मैदानावरील पंच आणि तिसरे पंच यांच्यात संभाषण होत असे. मात्र प्रेक्षकांना ते ऐकू येण्याची व्यवस्था नव्हती. मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने हे संभाषण ऐकता येणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रयोगाला मंजुरी दिली आहे. पंच पुनर्आढावा प्रक्रिया (डीआरएस), पंचांची चर्चा आणि रेफरल घेण्याप्रसंगी होणारे संभाषण आता जगजाहीर असणार आहे. अचूक निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी पंचांनी घेतलेली भूमिका आता चाहत्यांनाही कळू शकणार आहे.
‘‘पंचांचे काम प्रेक्षकांना कळावे हा यामागचा हेतू आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आगामी विश्वचषकात ही व्यवस्था अमलात येऊ शकते,’’ असे आयसीसीचे महाव्यवस्थापक जेफ अलारडाइस यांनी सांगितले.