नुकतीच आयसीसीने कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांची जागतिक क्रमवारी जाहीर केली. या यादीत अनपेक्षितपणे ऑस्ट्रेलियायचा स्टीव्हन स्मिथ याला अव्वल स्थान मिळाले. खरे पाहता बॉल टॅम्परिंग प्रकरणी घालण्यात आलेल्या बंदीमुळे स्मिथ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण विराटच्या खराब प्रदर्शनामुळे स्मिथला हा अनपेक्षित अव्वल क्रमांक मिळाला आहे. सध्याच्या यादीनुसार विराटच्या खराब कामगिरीचा फायदा ऑस्ट्रेलियाचा निलंबीत कर्णधार स्टिव्ह स्मिथला झाला असून, स्मिथ ९२९ गुणांसह अव्वल आहे. तर कोहलीच्या खात्यात सध्या ९१९ गुण जमा आहेत.

मात्र मंगळवारी आयसीसीने पुन्हा एक ट्विट केले. हे ट्विट ऑफिशियल हॅण्डलवरून करण्यात आले असून त्यात सर्व फलंदाजांना अव्वल क्रमांक देण्यात आला. पण हे ट्विट केवळ मजा म्हणून करण्यात आले होते. अमेरिकन रॅप गायक केन वेस्ट याने आपल्या ट्विटरवर ‘कोणीही कोणापेक्षाही उत्तम नसतं’, असे ट्विट केले होते.

त्या ट्विटवर उत्तर म्हणून आयसीसीने हे ‘एडिटेड फोटो ट्विट’ केले. या ट्विट मध्ये फलंदाजांची यादी खऱ्या क्रमवारीनुसारच आहे. परंतु क्रमांक नमूद केलेल्या ठिकाणी साऱ्यांच्या नावांपुढे १ आकडा टाकण्यात आला आहे.

 

इतकेच नव्हे तर ‘जर तू म्हणत असशील, तर ठीक आहे… ‘ असे केन वेस्टला उद्देशून ट्विटदेखील करण्यात आले आहे. आयसीसीच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी आणि क्रिकेटप्रेमींनी मनमोकळा प्रतिसाद दिला आहे.