20 November 2019

News Flash

World Cup 2019 ENG vs AFG : यजमान इंग्लंडचा अफगाणिस्तानावर एकतर्फी विजय

कर्णधार मॉर्गनच्या ७१ चेंडूत १४८ धावा

यजमान इंग्लंडने दुबळ्या अफगाणिस्तानावर विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात १५० धावांनी एकतर्फी विजय मिळवला. कर्णधार मॉर्गनच्या झंझावाती १४८ धावांच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानपुढे ३९८ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते. पण अफगाणिस्तानला केवळ ८ बाद २४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडने ५ सामन्यात ८ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानी धडक मारली. तर अफगाणिस्तानला ५ सामन्यात अद्यापही गुणांचे खाते उघडता आलेले नाही.

आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने अत्यंत सावध आणि संथ सुरुवात केली. ४ धावसंख्येवर त्यांनी पहिला डाव गमावला. दुसऱ्या गड्यासाठी ४८ धावांची भागीदारी केल्यानंतर गुलबदिन नैब ३७ धावांवर माघारी परतला. रहमत शाहने चांगली झुंज दिली पण तो देखील ४६ धावांवर बाद झाला. हाशमतुल्लाह शाहिदी याने दमदार अर्धशतक केले. तो ७६ धावा काढून तंबूत परतला. असघर अफगाण देखील अर्धशतकाच्या नजीक आला, पण तो ४४ धावा करून बाद झाला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. त्यामुळे अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

त्याआधी, सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ४४ धावांच्या सलामी भागीदारी नंतर विन्स २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटच्या साथीने बेअरस्टोने डाव सांभाळला. या दोघांनी १२० धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणारा बेअरस्टो शतकाला मात्र मुकला. ९० धावांवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. जो रुटने आपली खेळी चालू ठेवली आणि कर्णधार मॉर्गनच्या साथीने खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले.

रूटचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर मॉर्गनने खेळाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. त्याने तुफानी फटकेबाजी करत केवळ ५७ चेंडूत १०० धावांचा पल्ला गाठला. इतकेच नव्हे तर त्याने तब्बल १७ षटकार आणि ४ चौकार यांच्या मदतीने ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी केली. मोठा फटका खेळताना रूट आणि मॉर्गन दोघेही एकाच षटकात माघारी परतले. त्यानंतर मोईन अलीने ४ षटकार आणि १ चौकार खेचत ९ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या आणि संघाला ५० षटकात ६ बाद ३९७ धावांची मजल मारून दिली.

अफगाणिस्तानकडून दौलत झादरान आणि गुलाबदिन नैब या दोघांनी ३ -३ गडी बाद केले.

First Published on June 18, 2019 6:51 pm

Web Title: icc world cup 2019 eng vs afg england afghanistan cricket match updates vjb 91
Just Now!
X