बांग्लादेशच्या भूमीत विजयी मालिका सुरू ठेवत ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दिशेने आगेकूच करत असलेल्या टीम इंडियाने आज(बुधवार) सराव शिबिरात फूटबॉल खेळ खेळला. याआधीही संघाच्या सराव शिबिरातील प्रशिक्षकांनी टीम इंडीयाचा फूटबॉल सराव करून घेतला आहे. परंतु, यावेळी प्रशिक्षकाने ‘शूज’न घालता भारतीय संघाच्या खेळाडूंना फूटबॉल खेळण्यास सांगितले.
संघाचे व्यवस्थापक आर.एन.बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाच्या सराव शिबिरातील प्रशिक्षकाने भारतीय संघाला ‘शूज’न घालता सराव करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार संघाने ‘शूज’ न घालता भरपूर वेळ फूटबॉल खेळाचा आनंद लुटला. सराव शिबिराच्या अंती भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग भरपूर थकलेला आणि लंगडत चालताना दिसला त्यामुळे युवराजला दुखापत झाल्याची चर्चा समोर आली आहे. परंतु, युवराजच्या दुखापतीबाबतीत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
आपल्या निराशाजनक खेळीला बाजूला सारत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युवराजची बॅट पुन्हा तळपली होती. या सामन्यात ४३ चेंडुत ६० धावा युवराजने कुटल्या होत्या त्यामुळे युवराजला सुर गवसला असल्याची चिन्हे होती. परंतु, सरावात झालेल्या दुखापतीच्या चर्चेमुळे क्रिकेटरसिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.