बीसीसीआयने लावलेल्या आजन्म बंदीच्या शिक्षेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं असून ही शिक्षा खूपच कठोर आहे, आपल्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली पाहिजे अशी मागणी केली आहे. आपलं वय सध्या 36 असून मैदानात खेळण्याची क्षमता हळूहळू कमी होईल, त्यामुळे लवकर संधी मिळावी असं श्रीसंतने म्हटलं आहे. 2013 च्या आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर श्रीसंतवर क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

ज्येष्ठ वकील सलमान खुर्शिद यांनी सर्वोच्च न्यायालयात श्रीसंतची बाजू मांडली. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी ट्रायल कोर्टाने श्रीसंतला क्लीन चीट दिली असून त्याच्यावरील बंदी उठवून क्रिकेट खेळण्याची संधी दिली पाहिजे असं मत त्यांनी न्यायाधीश अशोक भूषण आणि अजय रस्तोगी यांच्या खंडपीठासमोर मांडलं. ज्या इतर खेळाडूंची नावं स्पॉट फिक्सिंग प्रकरणी समोर आली त्यांना तीन ते पाच वर्ष आणि श्रीसंतवर कायमची बंदी घालणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलं.

‘आजन्म बंदी खूपच कठोर आहे. तो आताच 35 वर्षांचा आहे. बंदीमुळे तो स्थानिक क्लब क्रिकेटही खेळू शकत नाही आहे. त्याला क्रिकेट खेळायचं आणि यासाठी इंग्लंडमधून ऑफरही आल्या आहेत. पण जर त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही तर ऑफरचा काही फायदा नाही’, असं सलमान खुर्शिद यांनी खंडपीठाला सांगितलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी कोणत्याही क्रिकेटरला इतकी कठोर शिक्षा झाली नसल्याचं सांगत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचं उदाहरण दिलं. मोहम्मद अझरुद्दीनला क्रिकेट प्रशासनावर पुन्हा येण्याची तसंच हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची बीसीसीआयकडून परवानगी देण्यात आली होती अशी माहिती त्यांनी खंडपीठाला दिला.

प्रशासकीय समितीचे वकील पराग त्रिपाठी यांनी युक्तिवाद करताना क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराचं कोणतंही प्रकरण सहन सहन केलं जाणार नाही. इतर खेळाडूंपर्यंत हा संदेश जावा यासाठी कठीण शिक्षा देण्यात आली असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली असून जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.