पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे. अशातच भारताने आता खेळाच्या मैदानावरही पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही वर्ल्ड कपमधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची तयारी केल्याचं दिसतंय. कारण, ‘जर टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये असं भारत सरकारला वाटत असेल तर आम्ही साहजिकच खेळणार नाहीत असं बीसीसीआयच्या सुत्रांनी स्पष्ट केलं आहे. वृत्तसंस्था एएनआयने बीसीसीआयच्या सुत्रांद्वारे हे वृत्त दिलं आहे.

मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिका पूर्णपणे बंद झाल्या असून केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या व आशिया चषक स्पर्धेत उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. पण आता पुलवामा हल्ल्यानंतर वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानविरोधात खेळण्याची गरज नाही अशी मागणी भारतात जोर धरत आहे.

बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरोधात खेळण्याबाबतचं चित्र वर्ल्ड कप स्पर्धा जवळ आल्यानंतर स्पष्ट होईल. आयसीसीला याच्याशी काहीच घेणंदेणं नाहीये. जर टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये असं भारत सरकारला वाटत असेल तर आम्ही साहजिकच खेळणार नाहीत. जर आम्ही खेळलो नाही, तर पाकिस्तानला गुण मिळतील आणि जर अंतिम सामन्यात पुन्हा ते समोर आले, तर न खेळताच ते वर्ल्ड कपचे मानकरी ठरतील.  याबाबत आम्ही अद्याप आयसीसीसोबत संवाद साधलेला नाही.” असं बीसीसीआयच्या सुत्रांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे, आगामी विश्वचषक स्पर्धेतही भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी जोर धरायला लागल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन पावलं मागे येत चर्चेची तयारी दाखवली आहे. आयसीसीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी दुबईत पार पडणाऱ्या बैठकीत दोन्ही बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. 27 फेब्रुवारी ते 2 मार्चदरम्यान दुबईत आयसीसीची बैठक पार पडणार आहे. या दरम्यान भारत-पाक सामन्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करु असं आश्वासन आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी म्हटलं आहे. क्रिकेट आणि राजकारण यांची सरमीसळ करू नये, असे पीसीबीनं आधीच स्पष्ट केलं होतं. पण, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेत पाकविरुद्धच्या सामन्यात बहिष्कार टाकण्याची शक्यता वाढली आहे.