भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर हा देश सोड आणि दुसऱ्या देशात जाऊन राहा, असा टोला चाहत्यांना लगावणाऱ्या विराट कोहलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियाम मंडळाच्या अधिकाऱ्यांने आपले मत व्यक्त केले असून त्यांनी विराटच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. तसेच चाहत्यांनी पाठ फिरवल्यास बीसीसीआय आणि खेळाडू दोघे अडचणीत येतील हे विराट विसरल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराटचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्याला विराटचे हे उत्तर आवडले नसल्याचे सोशल नेटवर्किंगवरून सांगितले आहे. त्याला टि्वटरवर अनेकांनी ट्रोलही केले आहे. आता याच प्रकरणावर बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी विराटला सुनावले आहे. आम्ही बीसीसीआयमध्ये क्रिकेट चाहत्यांचा सन्मान करतो आणि त्यांची आवड निवड आम्हाला महत्वाची वाटते. मला सुनील गावस्करांना फलंदाजी करताना पहायला आवडायचे. पण त्याच वेळी मला गॉर्डन ग्रीनीज, डेसमंड हेन्स, विव्ह रिचर्ड्स यांचीही फलंदाजी मला पाहायला आवडते. मला सचिन, विरेंद्र सेहवाग, सौरभ गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, राहुल द्रविड यांचा खेळ खूप आवडायचा पण त्याचप्रमाणे मार्क वॉ, ब्रायन लारा आणि इतर परदेशी खेळाडूही तितकेच आवडायचे असं चौधरी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

शेन वॉर्न हा फिरकी गोलंदाजांपैकी सर्वोत्तम गोलंदाज म्हणून पाहायला नक्कीच आवडायचे. मात्र अनिल कुंबळेला गोलंदाजी करताना पाहणे जास्त चांगले वाटायचे. तसेच ज्याप्रमाणे कपिल देव यांचा खेळ आवडायचा तसाच रिचर्ड हॅडली, इयान बोथम आणि इम्रान खानचा खेळ पहाणेही पर्वणीच असायचे. मला वाटतं असं करणं म्हणजे क्रिकेट खेळण्याच्या कौशल्याची कौतूक करणं. आणि हे कौतूक देश किंवा इतर कोणत्याही गोष्टींचे त्यात बंधन ठेऊ नये.

पुढे बोलताना त्यांनी विराटने व्यक्त केलेले मत चुकीचे असल्याचे सांगितले. विराटला हे लक्षात घ्यायला हवे की तो म्हणतो त्याप्रमाणे चाहते दुसऱ्या देशात गेले तर प्युमा वगैरेसारख्या कंपन्या त्याच्याबरोबर १०० कोटींचे करार करणार नाहीत. बीसीसीआयच्या कमाईवरही त्याचा परिणाम होईल आणि अर्थात असे झाले तर खेळाडूंच्या मानधानाला कात्री लागेल. जर त्याने बीसीसीआयबरोबर केलेला करार पाहिला तर त्याच्या लक्षात येईल या देश सोडून जा वक्तव्यामुळे त्याने करारातील काही नियमांचा भंग केला आहे. त्याने याआधी बीसीसीआयने नाइके कंपनीबरोबर केलेला करार मोडून प्युमाच्या कार्यक्रमासाठी इंग्लंडला जात करार मोडला होता त्याचप्रमाणे त्याने आत्ताही करारातील नियमांचे उल्लंघन केल्याचे चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले.

आता बीसीसीआय यासंदर्भात विराटवर काही कारवाई करते की त्याला समज देऊन सोडून देते हे येणारा काळच सांगेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If the fans go away players fees will but cut bcci slams virat kohli
First published on: 09-11-2018 at 10:56 IST