Ind vs Afg only test Flashback : भारताने शुक्रवारी अफगाणिस्तानच्या संघाचा १ डाव आणि २६२ धावांनी दारुण पराभव केला. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर हा अफगाणिस्तानचा पहिलाच कसोटी सामना होता. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला दोन दिवसातच धूळ चारली. भारताकडून शिखर धवन आणि मुरली विजय या दोघांनी शतकी खेळी केल्यामुळे भारताला ४५० धावांचा टप्पा गाठता आला. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाने फलंदाजीत भारतापुढे सपशेल शरणागती पत्करली.

भारताने अफगाणिस्तानच्या संघाला एकाच दिवसात दोन वेळा पूर्ण बाद केले. अफगाणिस्तानचा पहिला डाव १०९ धावांवर आटोपला, तर दुसरा डाव १०३ धावांवर आटोपला. पहिल्या डावात मोहम्मद नबीने सर्वाधिक २४ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात हशमतुल्ला शाहिदी याने सर्वाधिक नाबाद ३६ धावा केल्या. परंतु, दोनही डावात अफगाणिस्तानच्या फलंदाजांना दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही.

पदार्पणाच्याच कसोटीत संघाला एका दिवसात दोनदा तंबूत परतावे लागले आणि लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, अशा पद्धतीने एकाच दिवसात दोनदा संपूर्ण संघ परतण्याची ही पहिली वेळ नव्हती. या आधी सर्वप्रथम कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करण्याचा लाजिरवाणा विक्रम टीम इंडियाच्याच नावे आहे.

१९५२ साली मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध भारत विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली कसोटी सामना खेळत होता. त्यावेळी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचे २० गडी एकाच दिवसात माघारी परतले होते आणि तो सामना इंग्लंडने १ डाव आणि २०७ धावांनी जिंकला होता. या सामन्यातील आणखी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे भारताला त्या सामन्यात दोनही डावात साधे शतकही गाठता आले नव्हते. भारताचा पहिला डाव अवघ्या ५८ धावांवर तर दुसरा डाव ८२ धावांवर आटोपला होता. त्यामुळे फलंदाजीच्या बाबतीत पाहायचे झाल्यास भारताचा झालेला पराभव अफगाणिस्तानच्या पराभवापेक्षा अधिक लाजिरवाणा होता.