कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मधल्या फळीत अष्टपैलू रविंद्र जाडेजा यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने ऐतिहासिक मेलबर्न कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३२६ धावांपर्यंत मजल मारली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं अत्यंत चांगल्या पद्धतीने नेतृत्व करताना अजिंक्य रहाणेने कसोटी कारकिर्दीतलं १२ वं शतक झळकावलं. टीम इंडियाचा निम्मा संघ माघारी परतल्यानंतरही अजिंक्यने संयमी खेळी करत मोक्याच्या क्षणी शतकी खेळी केली.

अजिंक्यच्या या शतकी खेळीमुळे भारताला बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्याची चांगली संधी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्यच्या शतकांचा इतिहास तपासला तर…ज्या वेळी अजिंक्यने शतक झळकावलं आहे त्यावेळी टीम इंडिया एकदाही कसोटी सामना हरलेली नाही. ११ कसोटी शतकांपैकी ८ कसोटी सामन्यांत भारताने विजय मिळवला असून ३ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर १३१ धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे रविंद्र जाडेजासोबत एकेरी धाव घेताना धावबाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये धावबाद होण्याची ही त्याची पहिलीच वेळ ठरली.

दरम्यान पहिल्या डावात भारताकडून रहाणेव्यतिरीक्त रविंद्र जाडेजाने ५७ तर शुबमन गिलने ४५ धावांची खेळी करत आपली चमक दाखवली. त्यामुळे यापुढील दिवसांत टीम इंडिया कसा खेळ करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.