ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चहापानापर्यंत ३ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारली. आता भारताला विजयासाठी ३७ षटकात १४५ धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला सात गड्यांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाची भिस्त अनुभवी चेतेश्वर पुजारा याच्यावर आहे.

आणखी वाचा- शुबमन गिलची धमाका! मोडला सुनील गावसकरांचा ५० वर्ष जुना विक्रम

३२८ धावांचा पाठलाग करताना भारताची सलामी फारशी चांगली झाली नाही. रोहित शर्मा ७ धावांवर बाद झाला. पण भारताचा शुबमन गिल याने दमदार अर्धशतकी खेळी केली. आपला तिसराच कसोटी सामना खेळणारा शुबमन गिल याने १४६ चेंडूत त्याने ९१ धावांची खेळी केली. पुजाराच्या साथीने त्याने डाव सावरला. नव्वदीत असताना त्याने नॅथन लायनच्या बाहेरच्या रेषेत असलेल्या चेंडूला बॅट लावली आणि तो झेलबाद झाला. पण ८ चौकार आणि २ षटकारांसह त्याने भारताला लय मिळवून दिली. कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही वेगाने धावा करण्यास सुरूवात केली होती. त्याने एक षटकार आणि एक चौकार खेचत फटकेबाजी केली. पण त्यालाही २२ धावांवर बाद व्हावे लागले.