भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना ३१ धावांच्या छोट्या फरकाने जिंकला. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१९ धावांची आवश्यकता तर भारताला सहा बळी टिपणे गरजेचे होते. या परिस्थितीमध्ये भारत सरस ठरला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. पण ऑस्ट्रेलियाच्या संघात आणखी एक अष्टपैलू खेळाडू असता, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असे मत जाणकारांनी व्यक्त केले. याच सुरात सूर मिसळत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने एका खेळाडूला संघात खेळवण्याचा सल्ला दिला आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनीस याला जर पर्थ येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने निवडले नाही तर मला फार वाईट वाटेल, असे मत वॉर्नने व्यक्त केले आहे. दुसऱ्या सामन्यात स्टॉयनीसला संघात खेळवण्यात यायला हवे. स्टॉयनीसमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोंन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला होईल, असे तो म्हणाला.

मार्कस स्टॉयनीस मात्र सध्या दुखापतीने ग्रस्त आहे. एका स्थानिक सराव सामन्यात त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्याबाबत निवड समिती काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे आहे.

दरम्यान, पहिल्या कसोटीत विजयासाठी दिलेले ३२३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाला पेलले नाही. त्यांचा दुसरा डाव २९१ धावांत आटोपला. अष्टपैलू पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी खेळपट्टीवर संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. भारताच्या वेगवान गोलंदाजीपुढे कांगारुंची झुंज अपयशी ठरली आणि भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सामन्यात चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात १२३ तर दुसऱ्या डावात ७१ धावा केल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.