भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा सामना दिल्लीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत आहे. पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर दुसरे सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे पाचवा सामना हा अतिशय महत्वाचा आणि निर्णायक आहे. याच सामन्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्मा यांच्याकडून मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रमाला धोका निर्माण झाला आहे.
चौथ्या एकदिवसीय सामन्याच्या निकालानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिका २-२ अशी बरोबरीत आली आहे. त्यामुळे बुधवारी नवी दिल्ली येथील फिरोज शाह कोटला मैदानावर होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे. मालिका विजय आणि विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिने हा विजय भारतासाठी महत्वाचा असणार आहे. याशिवाय उपकर्णधार रोहित शर्मा याच्यासाठीही हा सामना खास आहे. या सामन्यात हिटमॅनला सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडण्याची तसेच माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचीही संधी आहे.
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात ४६ धावा केल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावे ८ हजार धावा होतील. या कामगिरीसह सर्वात जलद ८ हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची रोहितला संधी आहे. गांगुलीने २०० डावांत ८ हजार धावा केल्या होत्या. रोहितने आतापर्यंत १९९ डावांत ७ हजार ९५४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८ हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने १७५ डावांत हा पराक्रम केला आहे. त्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स याने १८२ डावात हा टप्पा गाठला होता. या यादीत तेंडुलकर पाचव्या तर धोनी सातव्या क्रमांकावर आहे. सचिनने हा टप्पा २१० डावात तर धोनीने २१४ डावात गाठला होता.
सर्वात जलद ८ हजार धावा
१. विराट कोहली (भारत) १७५ डाव
२. एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका) १८२ डाव
३. सौरव गांगुली (भारत) २०० डाव
४. रॉस टेलर (न्यूझीलंड) २०३ डाव
५. सचिन तेंडुलकर (भारत) २१० डाव
६. ब्रायन लारा ( वेस्ट इंडिज) २११ डाव
७. महेंद्रसिंग धोनी (भारत ) २१४ डाव
८. सईद अन्वर (पाकिस्तान) २१८ डाव
दरम्यान, या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या रोहितला चौथ्या सामन्यात सूर गवसला होता. मात्र रोहित शर्मा याचं शतक हुकलं. तो ९२ चेंडूत ९५ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने ७ चौकार आणि दोन षटकार केले. या ३ षटकारांच्या बळावर त्याने महेंद्रसिंग धोनीचस षटकार लागवण्याचा विक्रमही मोडीत काढला होता.