घरच्या मैदानात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. 2 टी-20 सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने 2-0 च्या फरकाने जिंकत इतिहासाची नोंद केली. अखेरच्या टी-20 सामन्यातही भारताचं 191 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. या मालिकेत भारताकडून लोकेश राहुलने दोन्ही सामन्यांमध्ये दमदार पुनरागमन केलं. पहिल्या सामन्यात अर्धशतक तर दुसऱ्या सामन्यात शिखर धवनसोबत धडाकेबाज भागीदारी करत राहुलने भारताची बाजू सावरुन धरली. आपल्या या पुनरागमनाचं श्रेय लोकेश राहुलने राहुल द्रविडला दिलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : जोडी तुझी-माझी ! कोहली-धोनीचं टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचं अर्धशतक

‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ही बंदी उठवल्यानंतर राहुलला इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात राहुलने 89 आणि 81 धावांची खेळी करत स्वतःला सिद्ध केलं. “आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून मी थोडा वेळ बाहेर होतो, त्यामुळे भारतात परतल्यानंतर मी नेमका कुठे चुकतोय याकडे लक्ष देण्यासाठी मला वेळ मिळाला. सुदैवाने मला भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, या सामन्यांमध्ये तुमच्यावर तितकी जबाबदारी नसते…त्यामुळे फलंदाज म्हणून तुम्ही स्वतःच्या तंत्रावर लक्ष केंद्रीत करु शकता. याचवेळी राहुल द्रविड सरांसोबतही माझी चर्चा झाली. या 5 दिवसांमध्ये त्यांनी केलेलं मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचं ठरलं.” लोकेश राहुल, द्रविडने दिलेल्या मार्गदर्शनाविषयी बोलत होता.

आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन केल्याबद्दल लोकेश सध्या खुश आहे. आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघात पर्यायी सलामीवीर म्हणून राहुलच्या नावाची चर्चा सुरु आहे. मध्यंतरीच्या काळात आपल्या फॉर्मशी झगडत असलेल्या राहुलला निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटची संधी दिली आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करुन विश्वचषक संघात आपलं नाव पक्क करण्यासाठी आपला पुरेपूर प्रयत्न असेल असं राहुलने सांगितलं. 2 टी-20 सामन्यांनंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – निवड समितीबद्दल आदर, पण माझ्या कामगिरीची दखल घ्यायला हवी – अजिंक्य रहाणे