सिडनी कसोटी सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना ऋषभ पंत दुखापग्रस्त झाला आहे. बीसीसीसीआयनं ट्विट करत पंतचं स्कॅन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र पंतची दुखापती किती गंभीर आहे याबाबत कोणतीही माहिती अद्याप दिली नाही. दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी पंत मैदानावर न उतरल्यामुळे क्रीडा चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. पंत ऐवजी यष्टीरक्षणासाठी वृद्धीमान साहा मैदानात उतरला आहे. याआधीच दुखापतीमुळे इशांत , शमी, केल एल राहुल आणि उमेश यादवसारखे अनुभवी खेळाडू बॉर्डर-गावसकर मालिकेला मुकले आहेत. त्यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. स्कॅनिंगनंतर पंतची दुखपत किती गंभीर आहे याबाबतची माहिती समोर येईल.

पॅट कमिन्स फेकलेला चेंडूचा ऋषभ पंतला अंदाज आला नाही. पंतला हा चेंडू बाऊन्सर येईल असं वाटलं. मात्र चेंडूनं उसळी न घेतल्यामुळे ऋषभ पंतला लागला. यामुळे पंतच्या डाव्या कोपऱ्याला जोराचा मार लागला होता. पंतला झालेल्या दुखापतीमुळे काही वेळ सामना थांबवण्यात आला होता. प्रथमिक उपचार घेतल्यानंतर पंतने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली. दुखपतीतही पंतनं किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला.

विहारी धावबाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या पंतनं आक्रमक खेळावर भर दिला. त्यानं ऑसींचा प्रमुख गोलंदाजांची पिटाई केली. पंतच्या आक्रमक खेळीमुळे ऑसींना त्यांचे डावपेच बदलावे लागले.  आक्रमक पंतनं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मात्र, हेजलूव़डने पंतला बाद केलं. पंतनं ६७ चेंडूचा सामना करताना चार चौकारासह ३६ धावांची छोटेखानी खेळी केली.

पाहा पंतला लागलेला चेंडू –

ऋषभ पंतनं मोडला रिचर्ड्स यांच्यासह तीन दिग्गजांचा मोडला विक्रम

सिडनी कसोटी सामन्यात २५ धावांचा टप्पा ओलांडताच ऋषभ पंतनं व्हिव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम मोडीत काढला. आता ऑस्ट्रेलियात लागोपाठ ९ डावांत २५ पेक्षा जास्त धावा काढणारा ऋषभ पंत एकमेव फलंदाज आहे. पंतनं व्हिव्ह रिचर्ड्स यांच्यासह वॅली हॅमोंड आणि रुसी सुर्ती यांचा विक्रम मोडीत काढला. या तिघांनीही ऑस्ट्रेलियात लागोपाठ आठ डावांत २५ पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. सिडनी कसोटी ऋषभ पंतनं ( २५, २८, ३६, ३०, ३९, ३३, १५९*, २९ , २९*) हा विक्रम मोडीत काढला आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा, लक्ष्मण, धोनी, कपिल देव आणि सुनील गावसकर यांच्यासराख्या दिग्गजांनाही असा कारनामा करता आला नाही. मात्र, ऋषभ पंतनं २३ व्या वर्षीच हा पराक्रम केला आहे.