ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात रविवारी झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने सामना ६ गडी राखून जिंकला. या मालिकेत पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. अशा परिस्थितीमध्ये मालिका वाचवण्यासाठी भारताला सामना जिंकणे अनिवार्य होते. त्यानुसार विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.

कोहलीने या सामन्यात ४१ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले. ६१ धावांची खेळी करताना कोहलीने सुरुवातीला संयमी तर गरजेनुसार तुफानी खेळी केली. याच दरम्यान ग्लेन मॅक्सवेल याच्या गोलंदाजीवर १७व्या षटकात कोहलीने एक उत्तुंग षटकार लगावला. हा षटकार ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपैकी कोणाचाही हाती लागला नाही. पण सीमारेषेच्या बाहेर उभ्या असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने तो चेंडू झेलला. कोहलीचा झेल पकडल्यानंतर प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केलेच. पण याशिवाय ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानेही ट्विट करत त्याचे कौतुक केले.

 

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ६ बाद १६४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डार्सी शॉर्ट याने सर्वाधिक ३३ धावा केल्या. या आंबवहनाचा पाठलाग करताना विराट कोहलीने शेवटपर्यंत झुंज देत अर्धशतकी खेळी केली आणि भारताला सामना जिंकवून दिला.