ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने सामन्यावर पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद २४ धावा केल्या आहेत. पण त्याआधी भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजारा (१९३) आणि ऋषभ पंत (१५९*) यांच्या दीडशतकी खेळाच्या जोरावर भारताने ही मजल मारली. या दोघांशिवाय मयंक अग्रवाल (७७) आणि रवींद्र जाडेजा (८१) यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ५९८ धावांनी पिछाडीवर आहे.

भारताने ऑस्ट्रेलियात ७१ वर्षात एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. या चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. सध्या सुरु असलेल्या चौथ्या सामान्यतही भारताने पहिल्याच डावात ६२२ धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयी होण्यासाठी ६२२ धावांपेक्षा जास्त धावा करून भारताला पुन्हा एकदा बाद करावे लागेल. सामन्यातील केवळ ३ दिवसांचा खेळ शिल्लक असताना ही बाब घडणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे हा सामना भारत जिंकू शकतो किंवा अनिर्णित राहू शकतो. अशा परिस्थितीत भारत ऑस्ट्रेलियात ७१ वर्षांमधील आपला पहिलावहिला कसोटी मालिका विजय नोंदवू शकतो.

दरम्यान, पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३०३ अशी भक्कम धावसंख्या उभारली होती. त्यापुढे आज खेळाला सुरुवात झाली. पहिल्या सत्रात नॅथन लॉयनने विहारीचा बळी टिपला. त्याने ४२ धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत दीडशतक लगावले, पण द्विशतकाने त्याला हुलकावणी दिली. तो १९३ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने नाबाद १५९ धावा केल्या. अखेर जाडेजा ८२ धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव घोषित करण्यात आला.

त्याआधी पहिल्या दिवशी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली होती. पण भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. संघात पुन्हा संधी मिळालेल्या लोकेश राहुलला अवघ्या ९ धावाच करता आल्या. जॉश हेजलवूडने त्याला माघारी पाठवले. नवोदित मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरला. त्यामुळे उपहारापर्यंत भारताने एका गड्याच्या मोबदल्यात ६९ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सत्रात मयंक ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून झेलबाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी त्याने पुजारासोबत ११६ धावांची भागीदारी रचली. चेतेश्वर पुजाराने कर्णधार विराट कोहलीला हाताशी घेत डाव पुढे नेला. पुजाराने अर्धशतक पूर्ण करत चहापानापर्यंत भारताला २ गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारून दिली. शेवटच्या सत्रात आधी कर्णधार कोहली २३ धावांवर आणि काही कालावधीने उपकर्णधार अजिंक्य रहाणे १८ धावांवर तंबूत परतला.