अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मात केल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी पर्थ कसोटीआधी संघाला आरामाची गरज असल्याचं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात मोठ्या धडाक्यात केली आहे. १४ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामना पर्थच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा –  VIDEO : …आणि रवी शास्त्रीची जीभ कमरेखाली घसरली

“दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने सुरुवातीचे सामने अगदी काही धावांच्या फरकाने गमावले होते. त्यामुळे मालिकेच्या सुरुवातीला संघाने चांगली कामगिरी केली की हुरुप येतो. सुरुवात चांगली झाली तर संघाच्या आत्मविश्वासातही वाढ होते. मात्र आता संघाला आरामाची गरज आहे, त्यामुळे पुढच्या कसोटी सामन्याआधी काही सरावाची सत्र रद्द होऊ शकतात. नेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, तुम्ही फक्त मैदानात येऊन तुमची हजेरी लावून हॉटेलच्या रुमवर परत जा. पर्थच्या खेळपट्टीवर जलदगती गोलंदाजांना मदत मिळते याचा प्राथमिक अंदाज आम्हाला आहे.” रवी शास्त्री सामना संपल्यानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधत होते.

याचसोबत रवी शास्त्री यांनी आपल्या संघातील गोलंदाजांचं कौतुक केलं. पहिल्या डावात भारताने केलेल्या २५० धावांचा गोलंदाजांनी यशस्वीपणे बचाव केला. गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारताला पहिल्या डावात १५ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. त्यांनी केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे, ही गोष्ट एका रात्रीत होत नाही. तुमच्या गोलंदाजीमध्ये शिस्त असणं गरजेचं आहे, मग तुमच्यासमोर कोणताही संघ असला तरीही फरक पडत नाही. रवी शास्त्रींनी आपलं मत मांडलं. यावेळी शास्त्री यांनी चेतेश्वर पुजाराच्या खेळीचंही कौतुक केलं.