चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीच्या आधारावर भारताने पहिल्या डावात, दिवसाच्या अखेरीस 9 गड्यांच्या मोबदल्यात 250 धावांपर्यंत मजल मारली. सलामीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर पुजाराने एका बाजूने भारताची बाजू लावून धरत, संघाचा डाव सावरला. मात्र ज्या पद्धतीने भारताचे आघाडीच्या फळीतले फलंदाज बाद झाले ते पाहता, आपल्या सहकाऱ्यांनी जबाबदारीने खेळायला हवं होतं असं मत चेतेश्वर पुजाराने केलंय, तो पीटीआयशी बोलत होता.

“पहिल्या दोन सत्रांमध्ये ऑस्ट्रेलियाने चांगला मारा केला, मात्र आम्हीही थोडा जबाबदारी खेळ करायला हवा होता. मला संयम राखायचा आहे आणि माझ्या पट्ट्यात येणाऱ्या चेंडूची वाट पहायची आहे हे मी मनाशी ठरवलं होतं. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज अचूक टप्प्यांवर मारा करत होते. आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनीही अधिक जबाबदारी खेळ करायला हवा होता, मात्र आजच्या चुकीतून ते धडा घेतील.” शतकवीर पुजाराने आपलं मत मांडलं.

“दुसऱ्या डावात आम्ही चांगली फलंदाजी करु अशी मला आशा आहे. माझ्या बाबतीत विचार करायचा झाल्यास, मी प्रथम श्रेणी क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळत असल्यामुळे मला पुरेसा अंदाज आलेला आहे.” रविचंद्रन आश्विन आणि इशांत शर्मा यांच्यासोबत पुजाराने महत्वाची भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. अखेरच्या सत्रात पॅट कमिन्सने केलेल्या अचूक फेकीमुळे पुजारा धावबाद होऊन माघारी परतला.